| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील कडाव गावात असलेल्या एसटी प्रवासी थांब्यावर अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. त्याविरोधात कर्जत प्रेस असोसिएशन, कर्जत प्रेस क्लब आणि रायगड जिल्ह्यातील पत्रकारांनी आंदोलन पुकारले होते. प्रशासनाने नमते घेत दोन दिवसात हे अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात निष्कासित करण्याचे स्पष्ट लेखी आश्वासन दिले आहे.
मागील दहा वर्षांपासून कडाव गावातील एसटी बस थांब्यावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले होते. शासकीय कागदपत्रांची पूर्तता, जागेची छाननी आणि पाहणी यानंतरही संबंधित बांधकामावर कोणतीही कारवाई होत नव्हती. त्यामुळे अखेर पत्रकारांनी थेट कृतीचा निर्णय घेत बेमुदत उपोषण पुकारले. 24 जुलै रोजी सकाळपासून कडाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात पत्रकारांनी उपोषण सुरू केले. उपोषण सुरू झाल्यानंतर ग्रामविकास अधिकारी प्रेमसिंग गिरासे, सरपंच करुणा पवार, कर्जत एसटी आगार व्यवस्थापक दयानंद मोरे, महादेव पालवे, ग्रामपंचायत सदस्य सुभाष शिंदे, हर्षद भोपतराव आणि कर्जतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बरोटे यांच्या उपस्थितीत संवाद झाला. यावेळी ग्रामपंचायतीच्यावतीने 26 जुलै रोजी पोलीस बंदोबस्तात हे अनधिकृत बांधकाम हटविण्यात येईल, असे लेखी आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर पत्रकारांनी तात्पुरते उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतला. मात्र, प्रशासनाने जर 26 जुलैपर्यंत कारवाई केली नाही, तर यापेक्षा अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही पत्रकारांनी दिला.






