आ. दळवींकडून पुन्हा एकदा आश्वासनं

रस्त्यांचे आश्‍वासन पूर्ण करण्यास अपयशी ठरल्याने नाराजी व्यक्त

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गेल्या पाच वर्षात विकासाच्या केवळ बाता मारण्याचेच काम आ. दळवींनी केले आहे. परंतु, एकही काम त्यांनी पूर्ण केलेले नाही, असा अलिबाग-मुरुड-रोहा मतदारसंघातील जनतेचा आरोप आहे. आमदार झाल्यावर पहिल्यांदा या मतदारसंघातील सर्व रस्ते चकाचक करेन, असे आश्‍वासन देत आ. दळवी पहिल्यांदा आमदार झाले. परंतु, त्यानंतर त्या आश्‍वासनांचा त्यांना विसर पडला असून, अद्याप रस्ते जैसे थेच आहेत. दरम्यान, शुक्रवारी झालेल्या गोंधळपाडा येथील प्रचार सभेत आ. दळवींनी गेल्या तीन वर्षांत अनेक रस्ते व अन्य विकासकामे केल्याचा दावा केला आहे. तसेच पुन्हा एकदा तीच आश्‍वासने देऊन मतदारांना भुलवण्याचा प्रयत्नदेखील केला आहे. परंतु, मतदारसंघातील रस्त्यांची अवस्था आजही अत्यंत बिकट आहे. साधे रस्ते दुरुस्त करता आलेले नसताना मतदारांना कोस्टल रोडचे स्वप्न दाखविण्याचे काम आ. दळवींनी गोंधळपाडा येथील सभेत केले आहे.

अलिबाग-रोहा रस्त्यावरुन प्रवास करताना प्रवाशांना प्रचंड त्रास होत आहे. धुळीमुळे आरोग्यही धोक्यात येण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांचे भूमीपूजन होऊन वर्ष होत आले तरीदेखील त्याचेही काम सुरु केले नाही. रस्त्यांचे आश्‍वासन पूर्ण करण्यास दळवी अपयशी ठरल्याची चर्चा जोरात सुरू आहे. त्यामुळे दळवींबाबत मतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहे. या निवडणुकीत मतदारांच्या रोषाचा फटका बसणार असून, त्यांना मतदारच पराभवाची धूळ चारणार असल्याचे चित्र आहे.

अलिबाग-रोहा मार्गावरील रस्त्यांचे भांडवल करीत महेंद्र दळवी यांनी मागील निवडणुकीत मते मिळविली होती. स्वखर्चाने रस्त्याचे काम करीन, असे आश्‍वासनही दळवींनी दिले होते. सध्या त्याबाबतचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मतदारांनी चांगल्या रस्त्यासाठी विश्‍वासाने दळवींना मते दिली होती. मात्र, दळवींनी मतदारांची घोर निराशा केली आहे. खड्डेमय रस्त्यामुळे प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

प्रधानमंत्री ग्रामसडक, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील अनेक गावांमधील रस्त्यांच्या कामांचे भूमीपूजन दळवी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. परंतु, आजही अनेक गावांतील रस्त्यांच्या कामांना सुरुवात झालेली नाही, अशी प्रतिक्रिया अनेक गावांतील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. दळवींच्या या भूमिकेबाबत अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मतदारांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.

रस्त्यांच्या कामांबाबत दळवींना दिलेले आश्‍वासन पूर्ण न केल्याने तीव्र संताप निर्माण झाला आहे. महेंद्र दळवी पुन्हा आमदार नको, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. परिणामी, विधानसभा निवडणुकीत दळवींना फटका बसण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात महायुतीमधील भाजपचे काही कार्यकर्ते दळवींच्याविरोधात असल्याचे चित्र आहे. त्याचाही परिणाम दळवींना भोगावा लागणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

… पण दळवी नको!
मागील पाच वर्षांत आमदार महेंद्र दळवी यांनी विकासाची आश्‍वासने दिली. प्रत्यक्षात मात्र अनेक कामे अजूनही त्याच अवस्थेत आहेत. विकासकामे करण्यास दळवी अपयशी ठरले आहेत. त्यामुळे महेंद्र दळवी पुन्हा आमदार नको, अशी संतप्त प्रतिक्रिया जनतेतून व्यक्त होत आहे.
भाजप राबविणार उरण पॅटर्न
महायुतीच्या भाजपसह शिंदे गटाची अलिबागमधील होरीजन येथील सभागृहात बैठक झाली. या बैठकीत भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत गोड बोलून शिंदे गटाची कानउघाडणी केली. दळवींच्या मनमानी कारभाराबाबत भाजपच्या काही कार्यकर्त्यांमध्ये आजही नाराजी आहे. अशातच अलिबाग विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर मंगळवारी 29 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरणार आहेत. त्यांच्या पाठीशी भाजपचे 85 टक्के कार्यकर्ते असल्याचे बोलले जात आहे. यावरुन शिंदे गटातील दळवींना पाडण्यासाठी भाजप अलिबागमध्ये उरण पॅटर्न राबविणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
Exit mobile version