प्रमोशन हवंय…हा आहे सर्वांत सोप्पा मार्ग!

। मुंबई । प्रतिनिधी ।
कोणत्याही क्षेत्रात काम करताना प्रमोशन मिळविणे फार कठिण असते. प्रमोशन मिळविण्यासाठी अनेकांना कित्येक वर्षे खडतर प्रवास करावा लागतो. अनेकदा वरिष्ठांची मर्जी सांभाळावी लागते. मात्र राजकिय क्षेत्रात एखादा स्टंट प्रमोशन देऊन जातो. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील घराबाहेर राडा करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता मोहसीन शेख याची युवासेना सहसचिवपदी नेमणूक करण्यात आली आहे. असे करून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्याच्या पाठीवर एकप्रकारे कौतुकाची थाप दिली असल्याचे बोलले जात आहे.

नारायण राणे यांच्या जुहू येथील बंगल्याबाहेर झालेल्या आंदोलनात मोहसीन अग्रेसर होता. यावेळी पोलिसांनी त्याला प्रचंड मारले. यात तो जखमी झाल्याने रुग्णालयात दाखल करावे लागले. त्याला पोलीस मारहाण करतानाची क्लिप सोशल मीडियावर पसरली आहे.

या आंदोलनानंतर रात्री उशिरा वरुण सरदेसाईंच्या नेतृत्वात युवासेनेच्या मुंबई कार्यकारिणीने शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची मवर्षाफ येथे भेट घेतली. यावेळी उद्धव यांनी शिवसेना स्टाइल आंदोलन करणार्‍या युवासेना पदाधिकारी आणि युवासैनिकांचे कौतुक केल्याचे समजते. त्यानंतर आता आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावणार्‍या मोहसीनची युवासेनेच्या सहसचिवपदी नेमणूक करण्यात आली.

मोहसीन शिवसेनेत येण्याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होता. काही कारणास्तव त्याने 2019च्या विधानसभा निवडणुकांच्या दोन वर्षे आधी अर्थात 2017ला राष्ट्रवादीला रामराम करत शिवसेनेत प्रवेश केला. सेनेत आल्यापासून त्याने चांगले काम करीत पक्षनेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले. युवासेनेच्या जनसंवाद यात्रेतही तो सहभागी होता. विशेष म्हणजे मोहसीनची पत्नी अद्यापही राष्ट्रवादीतच आहे.

Exit mobile version