निवृत्तीच्या टप्प्यात ग्रामविकास अधिकार्यांना बढती
| नेरळ | प्रतिनिधी |
रायगड जिल्हा परिषदेंतर्गत येणार्या 15 तालुक्यांतील ग्रामपंचायतींमध्ये सेवा बजावणारे अनेक ग्रामविकास अधिकार्यांना बढती मिळत नसल्याने ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत अधिकारी या पदावरच कायम होते. मात्र, निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या रायगड जिल्ह्यातील 12 ग्रामविकास अधिकारी यांना काही महिन्यांसाठी बढती दिली आहे.
दरम्यान, गेल्या सहा वर्षांत त्यापैकी एकाही ग्रामविकास अधिकार्यांना पंचायत समिती स्तरावरील विस्तार अधिकारीपदावर बढती मिळालेली नव्हती. मात्र, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडून अशा ज्येष्ठ ग्रामपंचायत अधिकारी यांना निवृत्तीच्या वाटेवर असताना मानाचे पान देण्यात आले असल्याने 14 पैकी 12 अधिकारी समाधानी झाले आहेत.
रायगड जिल्ह्यामध्ये पदोन्नतीमधून भरावयाची जवळपास 14 विस्तार अधिकारी (कृषी) पदे रिक्त होती. त्या पदासाठी दावेदार असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्या बढत्या मागील सहा वर्षांत झालेल्या नव्हत्या. त्याशिवाय ग्रामपंचायत विस्तार अधिकारी यांची पदेदेखील रिक्त होती. जिल्ह्यातील अनेक ज्येष्ठ आणि निवृत्तीच्या मार्गावर असलेले ग्रामपंचायत अधिकारीही अतिरिक्त गटविकास अधिकारी यांच्या दर्जाची वेतन श्रेणी मिळवत होते. मात्र, ते सर्व गेली सहा वर्षे ग्रामपंचायत अधिकारी पदावर कायम होते. त्यामुळे त्यांच्यावर होणारा अन्याय शासनाने दूर करावा, अशी मागणी ग्रामसेवक संघटनेने केली आहे. प्राधान्याने लक्ष घालून विस्तार अधिकारी पदोन्नती हा विषय तात्काळ मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामविकास अधिकारी संवर्ग संघटनेच्या वतीने अनेक वेळा अशी मागणी केली जात होती. मागील एक वर्षापासून काही पदे रिक्त असून, भरली जात नव्हती. तर पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले ग्रामपंचायत अधिकारी सेवानिवृत्त होण्याची वाट जिल्हा परिषद बघत असावी आहे काय, असा प्रश्न निवृत्तीच्या वाटेवर असलेल्या ग्रामपंचायत अधिकारी यांच्याकडून उपस्थित केला जात होता.
निवृत्त होत असलेले ग्रामविकास अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी हे विस्तार अधिकारी आणि अतिरिक्त गटविकास अधिकारी होणार का, असा प्रश्न कायम आहे. ग्रामसेवकांची ग्रामविकास अधिकारी म्हणून पदोन्नती मार्गी लावण्याची मागणी अखेर रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी मान्य केली आहे.त्यानुसार जिल्ह्यातील बढतीच्या प्रतीक्षेत असलेल्या 14 पैकी 12 ग्रामविकास अधिकारी यांना विस्तार अधिकारी पदावर नियुक्ती केले आहे. मात्र, दोन ग्रामविकास अधिकारी बढतीविना सेवानिवृत झाल्याने त्यांना विस्तार अधिकारी होण्याचा मान काही मिळाला नाही. परंतु, जिल्हा परिषद प्रशासन तालुका पंचायत समितीमधील अनेक पदे रिक्त ठेवून कोणते फलित सध्या करू पहात होते? असा सवाल विस्तार अधिकारी न बनलेले निवृत्त ग्रामविकास अधिकारी बोलत आहेत. परंतु, सहा वर्षे भिजत असलेला प्रश्न डॉ. भरत बास्टेवाड यांनी मार्गी लावल्याने समाधानदेखील ग्रामसेवक संघटना यांनी व्यक्त केला आहे.परंतु, ज्या 12 ग्रामपंचायत अधिकारी यांची विस्तार अधिकारी म्हणून बढती झाली आहे, त्यातील काही अधिकारी हे काही महिन्यांनी निवृत्त होणार आहेत, त्यामुळे त्यांना फार काही फायदा अशा बढती मिळालेल्या अधिकार्यांना होणार नाही.
यांना मिळाली बढती
रायगड जिल्ह्यातील विस्तार अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी वैभव ठाकूर, नारायण केणी, विनोद चांदोरकर, विजय राजपूत, एस.के. भगत, राजेंद्र डोंगरे, विलास कांबळे, बाबुराव वनवे, नरेश भोनकर, रामलाल चौधरी, मोहन दिवकर, नितीन खैरे यांना बढती मिळाली आहे.