। पोलादपूर । प्रतिनिधी ।
शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या शिवसैनिक व महिला कार्यकर्त्यांनी रविवारी (दि.17) सायंकाळी शहरातील मुख्य रस्त्यावरून शहरप्रमुख व माजी नगराध्यक्ष निलेश सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली उत्स्फूर्तपणे मशाल हाती घेऊन रॅली काढल्याने शहरातील मतदारांचे लक्ष वेधण्यात यश आले. प्रचार संपुष्टात येण्यापूर्वी पोलादपूर शहरात महाड मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार स्नेहल जगताप यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी सर्वच कार्यकर्ते जोमाने प्रचारयंत्रणा राबवित असल्याचे दिसून आले.
तांबडभुवन येथील शिवसेना महाविकास आघाडीच्या संपर्क कार्यालयामधून रविवारी सायंकाळी पोलादपूर शहरातून धगधगत्या मशाली घेऊन शेकडो महिला व पुरूष कार्यकर्त्यांची मशाल हाती घेऊन रॅली सुरू झाली. मुंबई-गोवा महामार्गावरील शिवछत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करीत पोलादपूर शहरातील महाबळेश्वर रोड व बाजारपेठेतून रॅली मतदारांमध्ये मशालीच्या चिन्हाचा प्रचार करीत तरूणांना रोजगार, आरोग्य, विकासकामे, परिवर्तन तसेच विविध लोकोपयोगी समस्यांसाठी उमेदवार स्नेहल जगताप यांना मशालीच्या चिन्हासमोरील बटन दाबून मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.
पोलादपूर शहरप्रमुख निलेश सुतार यांनी, शहरातील मतदारांचा प्रतिसाद पाहता शहरातून पाचशेपेक्षा अधिक मताधिक्य मशाल चिन्हाला मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी नगरसेविका श्रावणी शहा, तेजश्री गरूड, नगरसेवक स्वप्निल भुवड, निखिल कापडेकर, माजी नगरसेविका शुभांगी भुवड व शुभांगी चव्हाण, वैशाली संतोष चिकणे, सरपंच क्षमता बांद्रे, ललिता कापडेकर, नलावडे तसेच महिला व पुरूष कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.