। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्याच औद्योगिकीकरण आणि नागरीकरण झपाट्याने वाढत आहे.त्यामुळे पाण्याची तहान भागविणारे जलस्रोत अपुरे पडू लागल्याने अनेक भागात पाणी टंचाईचे संकट ओढावले आहे.त्यात रानसई धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव आज ही शासनस्तरावर पडून राहिला असल्याने वाढत्या औद्योगिकीकरणामुळे व वाढत्या लोकसंख्येमुळे पाणीटंचाईची समस्या भविष्यात उरणमध्ये तीव्र रुप धारण करेल,यात शंका नाही.
उरण तालुक्यात एन.ए.डी, ओएनजीसी, जेएनपीटी बंदर,भारत गॅस, महावितरण प्रकल्प हे केंद्र व राज्य सरकारचे महत्त्वाचे प्रकल्प असून या प्रकल्पावर आधारित इतर अनेक प्रकल्प उद्यास येत आहेत.या प्रकल्पांना, रहिवाशांना उरण तालुक्यातील रानसई व पुनाडे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.तसेच सिडकोच्या माध्यमातून पेण तालुक्यातील हेटवणे धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे.सध्या उरण तालुक्याची लोकसंख्या ही अडीच लाखांहून अधिक आहे.
उरण तालुक्याच्या जवळच नवीमुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ व शिवडी – न्हावा सेतू ( सिलींग) लवकरच उद्यास येत असल्याने या परिसराचा विकास साधण्यासाठी सिडकोने पुढाकार घेतला आहे.त्यामुळे भविष्याचा विचार करता, येत्या पाच,दहा वर्षांत या तालुक्यातील लोकसंख्या ही दुपटीने, तिपटीने वाढणार आहे.तसेच प्रकल्पही जोमाने वाढणार आहेत.त्यासाठी पाण्याची गरजही भासणार आहे.10 वर्षांपूर्वी तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या कार्यकाळात उरणला पाणी पुरवठा करणार्या रानसई धरणांच्या पाणलोट क्षेत्रात वाढ करण्यासाठी धरणांच्या बंधार्याची उंची वाढवावी असा निर्णय घेण्यात आला होता.परंतु त्याची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही.
उरण तालुक्यातील रानसई व पुनाडे धरणातील पाणीसाठ्याची पातली ही एप्रिल महिन्यातच घटत असल्याने या परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.एकंदरीत सध्याचे जलस्रोत अपुरे पडत आहेत.त्यासाठी नवीन जलस्रोत तयार करणे ही काळाची गरज आहे.त्यामुळे उरणचे आमदार महेश बालदी, जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे यांनी रानसई धरणाची उंची वाढवण्यासाठी व पुनाडे धरणाची गळती थांबविण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. न पेक्षा भविष्यात उरणकराची पाण्याची तहान भागविणारे जलस्रोत अपुरे पडतील,यात शंका नाही.
एमआयडीसीचे उरणचे उप अभियंता रविंद्र चौधरी यांच्याशी वारंवार मोबाईलद्वारे रानसई धरणातील पाणीसाठा व प्रकल्पांना, रहिवाशांना करण्यात येत असलेल्या पाणीपुरवठ्या संदर्भात माहिती घेण्यासाठी संपर्क साधला असता त्यांनी बोलण्यास नकार दर्शविला आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी उप अभियंता रविंद्र चौधरी यांना किती आस आहे.हे दिसून येत आहे.
रानसई धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव प्रलंबित
