पोलिसांकडून तीन महिलांची सुटका
| पनवेल | वार्ताहर |
स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणार्या खारघर, सेक्टर-8 मधील गुडविल गार्डन इमारतीमधील हॉट स्टोन वेलनेस स्पावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारुन कारवाई केली. दरम्यान, स्पा चालवणार्या महिलेला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत स्पामध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवण्यात आलेल्या तीन महिलांची सुटका केली आहे.
खारघर, सेक्टर-8 मधील गुडविल गार्डन इमारतीमधील हॉट स्टोन वेलनेस स्पामध्ये मसाज आणि स्पासाठी येणार्या ग्राहकांना वेश्यागमनाकरिता मुली पुरविण्यात येऊन त्यांच्या माध्यमातून वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे आणि त्यांच्या पथकाने सदर स्पावर कारवाई करण्यासाठी या स्पामध्ये बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. यावेळी स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची खात्री पटल्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने सदर स्पावर छापा मारला. यावेळी सदर स्पामध्ये तीन महिलांकडून स्पा आणि मसाजच्या नावाखाली जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करुन घेण्यात येत असल्याचे आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी हॉट स्टोन वेलनेस स्पाची चालक मालक जान्हवी उर्फ संध्या दिनेश चव्हाण (31) या महिलेविरोधात खाघरघर पोलीस ठाण्यात पीटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन तिला ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी स्पामध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवलेल्या तीन महिलांची सुटका केली. तसेच सदर स्पामधून रोख रक्कम आणि इतर आक्षेपार्ह वस्तू जप्त केल्या आहेत.