जंगली पीर नदीकाठी कठड्यांचे संरक्षण

कृषीवलच्या दणक्याने प्रशासनास जाग
| पाली-बेणसे । वार्ताहर ।
पाली खोपोली मार्गावरील जंगली पीर आंबा नदीकाठावरील धोकादायक वळणावर संरक्षण कठड्यांअभावा अपघाताचा मोठा धोका निर्माण झाला होता. याबाबत कृषीवलने मंगळवार, दि. 20 सप्टेंबर रोजी ‘जंगली पीर नदीकाठी अपघाताचा धोका’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या बातमीने संबंधित प्रशासन खडबडून जागे झाले असून, तुटलेले कठडे बसविण्यात आले आहेत.

सुरक्षेच्या दृष्टीने संरक्षण कठड्याची नितांत आवश्यकता होती. अनेक ठिकाणचे संरक्षण कठडे तुटलेल्या अवस्थेत होते. संरक्षण कठड्याअभावी वेगवान वाहने नदीत कोसळून मोठी जिवीतहाणी होण्याची भिती असल्याने एमएसआरडीसी प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली जात होती. कृषीवलने याविषयी आवाज उठविला होता. या वृत्ताची दखल घेऊन पाली खोपोली राज्य महामार्गाच्या वहातुक सुरक्षेसह प्रशासनाने येथील धोकादायक वळणावर नवीन व तुटलेले कठडे तातडीने बसविण्यात आले आहेत.

त्यामुळे वाहतूकदार व प्रवाशी जनतेतून आभार मानले जात आहेत. या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे व अपघाती क्षेत्र असूनही कोणतेही सूचना फलक याठिकाणी नाहीत, संरक्षण कठड्याच्या गंभीर समस्येकडे वृत्तपत्रातून आवाज उठविला, सामाजिक कार्यकर्त्या लता कळंबे यांनी या धोकादायक स्थितीबाबत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यामुळे प्रशासनाला जाग आली,आणि तातडीने उपाययोजना करण्यात आली.

Exit mobile version