सुखदेवे गेले, धाय‘तडक’ कार्यवाही करणार का?
| चौल | प्रतिनिधी |
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे अलिबाग-बेलकडे रस्त्यावर अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या रस्त्यावरील मोऱ्यांचे संरक्षक कठडे जमीनदोस्त झाले आहेत, रस्त्याची साईडपट्टी खचली आहे. याकडे अधिकाऱ्यांचे वारंवर लक्ष वेधूनसुद्धा अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. आतापर्यंत याठिकाणी भीषण अपघात होऊन अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. याबाबत आधीचे कार्यकारी अभियंता सुखदेवे यांनी फक्त आश्वासने देण्यापलीकडे काहीच केले नाही. त्यामुळे मोठा अपघात झाल्यास जबाबदार कोण, असा प्रश्न सर्वसामान्य जनता विचार आहे. सुखदेवे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी आलेल्या मोनिका धायतडक कार्यवाही करणार का, अशी येथील जनता विचारत आहे.
अलिबाग-रोहा, अलिबाग-मुरुड हे दोन्ही मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. दरम्यान, या मार्गावरील कुरुळ गावाच्या पुढील गिरोबा मंदिराच्या परिसरात रस्त्याची साईडपट्टी खचली असून, याठिकाणच्या दोन्ही मोऱ्यांचे संरक्षक कठडे जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता असल्याचे त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. त्यांनी मोऱ्यांवर संरक्षक कठडे बांधण्यात येतील असे आश्वासन दिले होते. परंतु, थातुरमातुर मलमपट्टी म्हणून प्लास्टिकच्या पट्ट्या छोट्या काठ्या उभ्या करुन लावण्यापलीकडे साहेबांनी काहीच केले नाही. आज त्या पट्ट्यादेखील गायब आहेत. आणि जे.ई. सुखदेवे यांचीही नुकतीच बदली झाली आहे. त्यामुळे रस्त्याचा, मोऱ्यांच्या संरक्षक कठड्यांचा प्रश्न आजही कायम आहे. अधिकारी येतात-जातात, त्यांना जनतेच्या जीवाशी काहीच देणे-घेणे नसते, हेच यावरुन स्पष्ट होत आहे. याबाबत स्थानिकांसह वाहनचालकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत नव्याने कार्यकारी अभियंतापदी रुजू झालेल्या मोनिका धायतडक यांच्याशी संपर्क साधला असता, पाहणी करुन तात्काळ उपाययोजना करु, असे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे पुन्हा एका अधिकाऱ्याची याचप्रश्नी आश्वासनात भर पडली आहे.
आश्वासनाचा विसर
या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत कृषीवलने वारंवार वृत्त प्रकाशित करीत बांधकाम विभागाला कल्पना दिली होती. सुखदेवे यांनी मोरीचे कठडे आणि रस्त्याची साईडपट्टी भरण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, हे हवेतच विरले असून, संबंधित कामाबाबत कोणतीच दखल घेतलेली नाही. जाणूनबुजून या कामाकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत असून, मोठा अपघात झाल्यास त्यास सार्वजनिका बांधकाम विभाग जबाबदार राहील, असा संताप व्यक्त होत आहे.
आनंदावर दुःखाचे सावट नको
आगामी सण-उत्सवाच्या काळात या मार्गावरुन मोठ्या संख्येने चाकरमान्यांच्या वाहनांची वर्दळ वाढणार आहे. याठिकाणी रात्रीच्या वेळी अंधाराचे साम्राज्य असते. त्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नाही. अशा वेळी मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. तरी, नव्याने रुजू झालेल्या कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांनी याबाबत लक्ष घालावे, अशी नागरिकांची मागणी आहे.
पाल्हे पुलाची डागडुजी, अवजड वाहनांना बंदीच
तालुक्यातील नागाव-सहाण बायपासवरील पाल्हे पूल कमकुवत झाला असून, पुलाचा दोन्ही ठिकाणचा सुरुवातीचा भाग खचला आहे. त्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील दोन-तीन वर्षे सातत्याने पावसाळ्याच्या दरम्यान या पुलावर हा पूल अवजड वाहनांसाठी बंद असल्याचे फलक लावण्यात येत होते. परंतु, यंदा कोणताही फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे कृषीवलने याबाबत कार्यकारी अभियंता मोनिका धायतडक यांच्या संपर्क साधला असता, पाल्हे पुलाची डागडुजी सुरू असून, काम 50 टक्केच झाले आहे. त्यामुळे अवजड वाहनांसाठी पुलावरील वाहतूक बंद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
सार्वजनिका बांधकाम विभागाच्या माघ्यमातून पाल्हे पुलाची डागडुजी करण्यात येत असून, पुलाच्या पिलरना प्लास्टर करण्यात येत आहे. त्यामुळे तीन-चार वर्षे अवजड वाहतुकीसाठी बंदीचे फलक लावणाऱ्या संबंधित विभागाने कोणती जादूची कांडी फिरवली, की त्यामुळे यंदा पूल अवजड वाहतुकीसाठी खुलेआम सुरू आहे, याबाबत विचारणा केली असता, पुलाचे काम सुरू असून, ते 50 टक्केच झाले. त्यामुळे अवजड वाहतुकीसाठी पूल बंद असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे धायतडक यांनी सांगितले.

अपघाग्रस्त परिसराची तात्काळ पाहणी करुन घेण्यात येईल. ताबडतोब याठिकाणी कायमस्वरुपी उपाययोजना करण्याची कार्यवाही करण्यात येईल. पाल्हे पुलाची डागडुजी सुरू असून, अवजड वाहनांना बंदी आहे. तसा सूचना फलक लावण्यात येईल.
मोनिका धायतडक,
कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग







