शेकापचा आक्रमक पवित्रा
| अलिबाग | प्रतिनिधी |
केवळ मतासाठी आश्वासनांचा पाऊस पाडणाऱ्या आमदारांनी मतदारांच्या तोंडाला पानेच पुसली आहे. रस्त्यांची अवस्था बिकट आहे. पाणी प्रश्न, विज बिल, आरोग्य आदी अनेक विषयांकडे दुर्लक्ष केले जात आहे. केवळ सत्तेच्या जोरावर सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी त्यांच्या पोकळ धमक्यांना भीक न घालता सर्वसामान्यांच्या हक्कासाठी आवाज उठविला. मात्र आमदारांच्या पत्नीला पन्नास खोके चांगलेच झोंबले आणि त्यांनी पाठीमागून भ्याड हल्ला केला. नागरिकांच्या मुलभूत हक्कांकडे दुर्लक्ष करुन न्यायासाठी लढणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी शिंदे गटाची गुंडगिरी गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत आहे. अखेर सत्तेचा माज असल्यामुळे कायद्याची तमा न बाळगता, नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या शिंदे गटाच्या गुंडगिरीविरोधात आक्रमक पवित्रा घेत शेतकरी कामगार पक्षाने बुधवारी (दि.20) निषेध व्यक्त केला.
यावेळी शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे, शेकाप जिल्हा सहचिटणीस ॲड. गौतम पाटील, शेकाप जिल्हा चिटणीस मंडळाचे सदस्य अनिल पाटील, शेकाप अलिबाग तालुका चिटणीस सुरेश घरत, शेकाप मुरूड तालुका चिटणीस विजय गिदी, अलिबाग तालुका सहचिटणीस नरेश म्हात्रे, शेकाप तालुका महिला आघाडी प्रमुख नागेश्वरी हेमाडे, शेकाप शहर महिला आघाडी प्रमुख ॲड. निलम हजारे, सोनाली कासार, सतिश प्रधान, अशोक प्रधान, अनिल चोपडा, संजना किर, अनिल गोमा पाटील, विक्रांत वार्डे, आदींसह वेगवेगळ्या आघाडीचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना शेकापच्या राज्य महिला आघाडी प्रमुख ॲड. मानसी म्हात्रे म्हणाल्या कि, हा हल्ला शेतकरी कामगार पक्षाच्या स्वाभीमानावर झालेला हल्ला आहे. समोरून हल्ला करण्याची त्यांची हिम्मत नाही, म्हणून मागून हल्ला करण्याचा डाव केला आहे. संपूर्ण राज्यात शेतकरी कामगार पक्षाची महिला आघाडी आक्रमक म्हणून ओळखली जाते, त्या पद्धतीने निषेध व्यक्त केला पाहिजे. चवळ्या पावळ्यांना महत्व न देता सुरु असलेल्या दंडेलशाही विरोधात लढण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन करीत शेकापच्या नेत्या, प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध मानसी म्हात्रे यांनी व्यक्त केला.
शेतकरी भवन समोर निषेध मोर्चा
शेकापच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्यावर मागून मंगळवारी भ्याड हल्ला करण्यात आला. या भ्याड हल्ल्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. सर्वत्र जाहीर निषेध व्यक्त केला जात आहे. चित्रलेखा पाटील यांच्यावर मागून झालेल्या हल्ल्याच्या विरोधात शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने निषेध सभा अलिबागमध्ये घेण्यात आली. यावेळी महिलांसह अनेकांनी हल्ल्याचा निषेध आपल्या शैलीत व्यक्त केला. त्यानंतर शेतकरी भवन समोर सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन मानसी दळवीसह अन्य जणांविरोधात घोषणा देण्यात आल्या. या निषेध मोर्चात शेकाप पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, तरुण, तरुणी व ज्येष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.दरम्यान हातात काळे झेंडे दाखवून अनेकांनी व्यक्त केला.
षडयंत्र करणाऱ्यांना रोखण्याची गरज - सुरेश घरत
साम, दाम, दंड, भेदचा वापर करून दाबण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. आपल्यावर हात उगारणाऱ्यांचे हात मोडण्याची ताकद आपल्यामध्ये आहे. दहशत करून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. करोडो रुपयांचा निधी आणल्याच्या जाहीरातबाजी मोठ्या प्रमाणात केल्या. परंतु तो पैसा गेला कुठे असा सवाल दळवी यांना विचारला जात आहे. ठेकेदारांकडून टक्केवारी घेऊन त्यांना कामे मिळत नाही, त्यामुळे ठेकेदार शिवी देत आहेत. समाजकार्य फक्त शेकापचे आहे. या तालुक्यात अनेक विकास कामे ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून झाली आहेत. शेकापच्या नेत्या चित्रलेखा पाटील यांचे कार्य समाज कार्य मोठे आहे. त्यांना रोखण्यासाठी विरोधकांचे षडयंत्र चालू आहे. वेगळ्या पध्दतीचे आंदोलन करण्याची गरज आहे. या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे.











