। वावोशी । वार्ताहर ।
परभणी जिल्ह्यातील संविधान अपमान प्रकरण आणि सोमनाथ सुर्यवंशी या युवकाचा संशयास्पद मृत्यूचा निषेध करत फुले शाहू विचारमंच विभागाने वावोशी बंदची हाक दिली होती. त्या हाकेला साथ देत वावोशीमधील व्यापारी संघटनेने सकाळी 9 वाजल्यापासून ते दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने वगळता संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून परभणीमधील झालेल्या निंदनीय कृत्याचा निषेध नोंदविला आहे. यावेळी या निषेधामध्ये परभणीमधील संविधान अपमान करणार्या आरोपीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली.
परभणीत संविधानप्रेमी जनतेने 11 डिसेंबर रोजी आंदोलन केले होते. मात्र, पोलिसांनी या आंदोलनावर अमानुष लाठीचार्ज केला आणि शेकडो आंदोलकांना अटक केली. या कारवाईत सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा पोलीस कोठडीत मृत्यू झाला. सोमनाथ सुर्यवंशी यांना अमानवीय पद्धतीने अत्याचार करून मारण्यात आले त्या पोलीस अधिकार्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी देखील मागणी यावेळी करण्यात आली. यावेळी एल.बी.पाटील, सलीम शेख, भगवान ढेबे, पांडूरंग मोरे, गणेश मोरे, सुनील भालेराव, अजित मोरे, शिरीष मोरे, तानाजी शिंदे, संतोष शेवाळे, जतिन मोरे, अनंत हिरवे, हेमंत धारवे, विलास काकडे, राजू गुप्ता, अशोक मोरे, भरत गरुडकर, प्रितेश हडप, सारिका जाधव, प्रमोद उगले, शाहिद शेख, अमर नेपाळी, अरुण पाटील, राजू भालेराव, दिनेश मोरे, मिलिंद मोरे, सुभाष व्हालकर, अक्षय भालेराव, किसन मोरे, रुपेश मोरे, व्यापारी संघटनेचे सदस्य, पदाधिकारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.