| पनवेल | प्रतिनिधी |
महापालिका निवडणूकीच्या रणधुमाळीत विकास, आश्वासने आणि प्रचाराचे दावे सुरू असतानाच कामोठे उपनगरातील नागरिकांना मात्र गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. एरवी दुर्लक्षित राहणारा पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐन निवडणुकीच्या काळात उफाळून आल्याने मतदारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख सचिन त्रिमुखे व विभागप्रमुख बबन गोगावले यांनी तीव्र शब्दात सिडको प्रशासनाचा निषेध केला आहे.
कामोठे उपनगरात सुमारे अडीच लाखांची लोकवस्ती आहे. या उपनगराची दररोजची पाण्याची मागणी सुमारे 42 दशलक्ष लीटर असताना प्रत्यक्षात केवळ 32 दशलक्ष लीटर पाणी मिळते. सिडको महामंडळाकडे स्वतःचे धरण नसल्यामुळे नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून उसन्या पाण्यावर कामोठेकरांची तहान भागवली जाते. अशातच कळंबोली सर्कल येथील मुख्य जलवाहिनीवरील व्हॉल्व तुटल्याने पाणीपुरवठा विस्कळीत झाला. शनिवारी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असले तरी प्रत्यक्ष पाणी नियमित होण्यासाठी किमान एक दिवस लागणार असल्याने रविवारीही पाणीटंचाईची शक्यता आहे. पाणीपुरवठा का कमी झाला, याची माहिती घेण्यासाठी नागरिक सिडकोच्या अभियंता कार्यालयात गेले असता तेथे अधिकारीच अनुपस्थित असल्याची तक्रार रहिवाशांनी केली. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. निवडणुकीच्या काळात नळाला पाणी नसणे ही उमेदवारांसाठी धोक्याची घंटा ठरत आहे. या अनागोंदी कारभाराचा शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे उपशहर प्रमुख सचिन त्रिमुखे व विभागप्रमुख बबन गोगावले यांनी तीव्र शब्दात सिडको प्रशासनाचा निषेध केला आहे.







