कंत्राटी नर्सेसचे शिवतीर्थासमोर आंदोलन

शासनाच्या सेवेत समायोजन करण्याची मागणी

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

कंत्राटी एएनएम आणि जीएनएम कर्मचाऱ्यांना शासनाच्या सेवेत सनदशीर मार्गाने समायोजन करावे यासाठी रायगड जिल्ह्यातील महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या 120 कर्मचाऱ्यांनी रायगड जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते कंत्राटी नर्सेस युनियनच्या संघटनेच्या वतीने समायोजनेच्या मागणीसाठी आझाद मैदानावर, मुंबई येथे बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानुसार सार्वजनिक आरोग्यमंत्री यांच्या मंत्रालय कक्षात संघटना प्रतिनिधी व उच्चस्तरीय प्रशासकीय अधिकारी यांच्यासमवेत 20 मार्च रोजी बैठक घेण्यात आली. त्यामध्ये आरोग्य सेविका अधिपरिचारीका व इतर एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. मात्र, ही चर्चा केवळ कर्मचाऱ्यांच्या पदरी निराशा आल्याचे कर्मचाऱ्यांनी संगितले.

विधानसभा व विधान परिषद सदस्यांनी आरोग्य सेविका अधिपरिचारिका व इतर एनएचएम कंत्राटी कर्मचाऱ्यांना यांच्या समायोजानाबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सार्वजनिक आरोग्यमंत्र्यांनी विधानसभेत शासनातर्फे 31 मार्च पर्यंत उच्च न्यायालय मुंबई खंडपीठ औरंगाबाद यांच्या आदेशानुसार शासन सेवेत समायोजन करण्यात येईल असे आश्वासन दिले असल्याचे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्याप्रमाणे विविध जिल्हा परिषदा आणि महानगरपालिका, नगरपालिका स्तरावर कार्यरत असलेल्या ग्रामीण व शहरी भागातील आरोग्य सेवेतील कंत्राटी परिचारिका व अधिपरिचारिका यांना शासकीय सेवेत समायोजन करण्याबाबत अद्याप कोणतेही ठोस निर्णय व सकारात्मक हालचाली होत नसल्याने संबंधित कंत्राटी आरोग्य सेविका व अधिपरिचारिका हवालदिल झालेल्या आहेत, असे निवेदनात म्हटले आहे.

Exit mobile version