| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
जंतरमंतरवर पुन्हा एकदा तरुणांनी एल्गार पुकारला आहे. चलो संसद हे आंदोलन पोलिसांनी चिरडण्याचा प्रयत्न केल्यानंतर मंगळवारी (दि.22) पुन्हा एकदा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली. गुंडागर्दी नही चलेगीच्या घोषणा देत तरुणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला. काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याने विद्यार्थी पुन्हा एकदा आक्रमक झाले. त्यामुळे पोलिसांनी पुन्हा एकदा विद्यार्थ्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे वातावरण पुन्हा तापलं.
गेल्या 23 दिवसांपासून कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन जंतरमंतरवर सुरू आहे. सोनम वांगचुक उपोषणाला बसले होते. त्यांचं उपोषण मोडीत काढल्याने तरुण अधिकच आक्रमक झाले. त्यांनी सरकारच्या हुकूमशाहीविरोधात जोरदार घोषणाबाजी दिली. त्यामुळे पोलिसांनी तरुणावर लाठीमार केला. अनेक विद्यार्थी या आंदोलनात जखमी झाले. मुलींनाही प्रचंड मार लागला. अनेकांची धरपकड करण्यात आली. त्यामुळे जंतरमंतरवरची परिस्थिती हाताबाहेर गेली होती.
अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात पुन्हा आंदोलन सुरू झालं. रात्रभर हे आंदोलन सुरू होतं. मंगळवारी सकाळीही आंदोलन सुरू होतं. पण दुपारनंतर हे आंदोलन अधिकच पेटलं. दुपारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आंदोलनस्थळी आले. त्यांनी मोदींच्या निवासस्थानासमोरच ठिय्या आंदोलन सुरू केलं. त्यामुळे विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले. त्याचवेळी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांनीही आंदोलनस्थळी येऊन अभिजीत दीपके यांच्याशी संवाद साधला.
…तरीही घोषणा सुरूच
मंगळवारी तरुणांनी केंद्र सरकारला प्रचंड धारेवर धरलं. गुंडागर्दी नही चलेगी, तानाशाही नही चलेगीच्या घोषणा देऊन संपूर्ण परिसर दणाणून सोडला. तरुण आक्रमक झाल्याने पोलिसांनी त्यांची धरपकड सुरू केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण निर्माण झालं. तरुणांना व्हॅनमध्ये कोंबल्यानंतरही त्यांच्या घोषणा सुरूच होत्या.
जंतर मंतरवर अभिजीत दिपके आणि शरद पवारांची भेट
शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायलाच पाहिजे, ज्या मुलांनी आत्महत्या केलीय त्यांच्या कुटुंबियांना एक कोटी रुपये नुकसान भरपाई मिळायला हवी, सोनम वांगचुक यांना अवैध पद्धतीने ताब्यात घेतले असून, त्यांची तत्काळ सुटका करण्यात यावी, देशभर मुलांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात यावेत, दिल्ली पोलिसांची देखील चौकशी व्हायला हवी, अशा मागण्या आंदोलकांच्या असल्याची माहिती अभिजीत दिपकेंनी शरद पवारांशी चर्चा करताना दिली.
महाराष्ट्र बंदची हाक
दिल्लीत नीट परीक्षा आणि शिक्षण व्यवस्थेतील सुधारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद आता महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. पोलिसांच्या या अमानुष कारवाईचा आणि दडपशाहीचा निषेध नोंदवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
