मोर्चा रोखला, भुमिपुत्र भडकला

पनवेलपासूनच पोलिसांची नाकेबंदी, आंदोलनकर्त्यांवर केली कारवाई

| पनवेल ग्रामीण | वार्ताहर |

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्व. लोकनेते तथा माजी खासदार दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, या मागणीसाठी विधानभवनावर धडक देण्यासाठी निघालेल्या हजारो भूमिपुत्रांचा एल्गार बुधवारी (दि.8) कामोठे टोलनाक्यावर पोलिसांच्या नाकेबंदीत अडविण्यात आला. पनवेलपासूनच उभारलेल्या कडेकोट बंदोबस्तात आंदोलनकर्त्यांना मुंबईच्या दिशेने जाण्यापासून रोखण्यात आले, तर अनेकांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेण्यात आले.

मुसळधार पाऊस, पोलिसी अडथळे आणि कारवाईची पर्वा न करता घोषणांनी परिसर दणाणून सोडणाऱ्या आंदोलनकर्त्यांनी सरकारवर तीव्र संताप व्यक्त केला. मोर्चा थांबवता आला, पण दि. बा. पाटील यांच्या नावासाठी पेटलेला संघर्ष थांबवणे कोणालाही शक्य नाही, असा इशारा देत आंदोलन आणखी तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व उपोषणकर्त्या रश्मिता पोपेटा यांनी केले. आंदोलनात भिवंडीचे खासदार सुरेश (बाळ्यामामा) म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांच्यासह लोकनेते दि. बा. प्रेमी नामकरण समितीचे पदाधिकारी, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि हजारो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले.

सकाळपासूनच आंदोलक पनवेलमध्ये एकत्र येऊ लागले. भर पावसात हातात फलक, बॅनर आणि लोकनेते दि. बा. पाटील यांची छायाचित्रे घेऊन एकच नाव… दि. बा. पाटील नाव, प्रकल्पग्रस्तांचा सन्मान करा, विमानतळाला दि. बा. पाटील यांचेच नाव द्या, सरकार जागे व्हा, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. आंदोलक मुंबईकडे रवाना होण्यापूर्वीच पनवेलमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पोलिसांनी आंदोलनातील प्रमुख नेत्यांना प्रतिबंधात्मक ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतरही मोठ्या संख्येने आंदोलकांनी विधानभवनाच्या दिशेने कूच करण्याचा निर्धार कायम ठेवला. यानंतर सायन-पनवेल महामार्गावरील कामोठे टोलनाका परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त उभारून आंदोलन रोखले. आंदोलकांनी पुढे जाण्याचा प्रयत्न करताच पोलिसांनी त्यांना अडविले. काही काळ पोलीस आणि आंदोलकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करत अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले. महिला आंदोलकांसाठी स्वतंत्र महिला पोलीस पथके तैनात करण्यात आली होती. अनेक आंदोलकांना पोलीस वाहनांमध्ये बसवून विविध पोलीस ठाण्यांकडे हलविण्यात आले. भर मुसळधार पावसातही आंदोलकांनी घोषणाबाजी सुरू ठेवत आपल्या मागणीवर ठाम असल्याचे दाखवून दिले.

दरम्यान, पोलिसांच्या कारवाईमुळे काही काळ सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक संथ झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. आंदोलन रोखण्यात आले असले तरी नामकरणाच्या मागणीसाठी संघर्ष आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला.

परवानगी का नाकारली?
विशेष म्हणजे, आंदोलनकर्त्यांनी पोलीस प्रशासनाकडे नियमानुसार मोर्चासाठी परवानगी मागितली होती. सुरुवातीला मोर्चा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातून काढण्याचा प्रस्ताव होता. पोलिसांच्या सूचनेनुसार आयोजकांनी मार्गात बदल करून पनवेलच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चा काढण्याचे मान्य केले. तरीदेखील अंतिम क्षणी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली. परवानगी द्यायची नव्हती तर मार्ग बदलण्यास का सांगितले? सरकारला नेमकी भीती कशाची आहे? असा संतप्त सवाल आंदोलकांनी उपस्थित केला.
आंदोलन चिरडण्याचा पोलिसांचा डाव!
माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पोलिस प्रशासनावर थेट निशाणा साधताना सांगितले की, यापूर्वीही रायगडमध्ये अनेक आंदोलने केली आहेत. सर्व आंदोलनांना परवानगी मिळतेच असे नाही. मात्र यावेळी पोलिसांची भूमिका दडपशाहीची असून ती निषेधार्ह आहे. आम्ही आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहोत. खासदार सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे यांनीही सरकारवर कठोर शब्दात टीका केली. ‌‘नवी मुंबई विमानतळासाठी आपल्या जमिनी दिलेल्या भूमिपुत्रांची ही लढाई आहे. या लढ्याला पोलिसी बळाने थांबवता येणार नाही. दि. बा. पाटील यांच्या नावासाठीचा संघर्ष आणखी तीव्र होईल,' असा इशारा त्यांनी दिला.
सत्ताधारी स्थानिक आमदारांचा धिक्कार
विशेष म्हणजे, सत्ताधारी महायुतीतील भारतीय जनता पक्ष, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांनी या आंदोलनापासून अंतर राखले. त्यामुळे विरोधकांनी सरकारवर राजकीय हेतूने आंदोलन दडपल्याचा आरोप केला. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी या आंदोलनाबाबत मौन बाळगल्याने भूमिपुत्रांनी त्यांचा शिवराळ शब्दात धिक्कार केला.
Exit mobile version