| पनवेल | प्रतिनिधी |
सिडको, राज्य शासन व अदानीच्या त्रासाला कंटाळून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांची सिडको व अदानी कंपनीकडून नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांवर होणार्या अत्याचाराचा निषेधार्थ 12 जुलै रोजी ओवळे फाटा येथील खाडीत जलसमाधी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो प्रकल्पग्रस्त सहभागी झाले होते.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांना नोकरी व रोजगार मिळाला पाहिजे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भराव, नदीपात्रामुळे पूरग्रस्त व ब्लास्टिंगमुळे ओवळे, दापोली, पारगाव, डुंगी, भंगारपाडा या गावांचे पुनर्वसन त्वरित करावे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जमीन संपादन करून सहा वर्षे झाली त्याचे नुकसानभरपाई द्यावी, यूडीसीपीआर येण्यास उशीर झाल्याने बांधकाम परवानगी वाढवून देणे, या मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी ओवळे खाडीमध्ये जलसमाधी आंदोलन केले. यावेळी सिडकोविरोधात घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रत्येक गावाला खेळाचे मैदान मिळाले पाहिजे, विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव त्वरित द्यावे, यादेखील मागण्या करण्यात आल्या.
12 जुलै रोजी विमानतळबाधित प्रकल्पग्रस्तांनी ओवळे खाडीत जलसमाधी आंदोलन केले. यावेळी पोलिसांनी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिडकोचे अधिकारी आल्याशिवाय आम्ही बाहेर निघणार नाही अन्यथा याच नदीत खाडीत जलसमाधी घेऊ, असे प्रकल्पग्रस्तांनी सांगितले. त्यानंतर सिडकोचे अधिकारी येऊन त्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या ऐकून घेऊन त्यांना आश्वासित केले. येत्या 30 तारखेला मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आणखी उग्र आंदोलन, कामबंद आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.