अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून जुनी पेन्शन योजना सुरू करा, शिक्षकांच्या वेतनातील त्रुटी सोडवाव्यात, शिक्षणाधिकारी यांनी शिक्षकांच्या असलेल्या समस्या सोडवाव्यात या मागण्यासाठी आज अलिबाग येथे जिल्हा परिषदेसमोर जिल्हा माध्यमिक शिक्षकांनी धरणे आंदोलन केले. यावेळी शिक्षकांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करून भ्रष्ट कारभाराबाबत निषेध व्यक्त केला. आपल्या विविध मागण्यांचे निवेदन शिक्षक शिष्टमंडळाने शिक्षणाधिकारी यांना दिले. शाळेतील शिक्षकांनी काळ्या फिती लावून आंदोलनात सहभाग घेतला. माध्यमिक शिक्षकांचे आजचे धरणे आंदोलन हे राज्यभर आज करण्यात आले.
अलिबाग जिल्हा परिषदेसमोर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या वतीने कोकण अध्यक्ष नरसु पाटील यांच्या अध्यक्षतेखाली धरणे आंदोलन करण्यात आले. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शासन दरबारी आंदोलन, मोर्चे, कामबंद आंदोलन करण्यात आले आहेत. मात्र, अद्यापही शिक्षकांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. शासनाने शिक्षकांच्या मागण्या लवकरात लवकर सोडवाव्यात आणि जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी इतर राज्यांनी केंद्राकडे विधानसभा ठरावद्वारेव शिफारस केल्या आहेत. महाराष्ट्र शासनानेही तशी शिफारस तात्काळ करावी, केंद्रप्रमाणे सर्व लाभ मिळावे, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी याच्या भविष्य निर्वाह निधीच्या पावत्या, रक्कम आणि सातव्या वेतन आयोगाचा फरकाचा पहिला थकीत हफ्ता त्वरित मिळावा या मागण्याचे निवेदन शिक्षणाधिकारी याना दिले आहे.