पाण्यासाठी सिडकोवर हल्लाबोल

कामोठेकरांच्या मदतीला महाविकास आघाडी
शेकाप आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा
पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगर पालिकेच्या कामोठे विभागात तीव्र पाणीटंचाईच्या विरोधात दि. 22 ऑक्टोबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने सिडको ऑफिस कामोठे येथे मोर्चा काढण्यात आला. शेकाप आ. बाळाराम पाटील यांनी या मोर्चाचे नेतृत्व केले. यावेळी कार्यकारी अभियंता चौतानी आणि सहाय्यक अभियंता चहरे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी आ. बाळाराम पाटील यांच्यासह काँग्रेसचे आर.सी. घरत, पनवेल विधानसभा अध्यक्ष काशीनाथ पाटील, राष्ट्रवादीचे सूरदास गोवारी, नगरसेवक सतीश पाटील, नगरसेवक गोपाळ भगत, नगरसेवक विष्णू जोशी, नगरसेवक रवींद्र भगत, माजी नगरसेवक प्रमोद भगत, डॉ. धनंजय क्षीरसागर, जयेश लोखंडे, माजी शिवसेना शहरप्रमुख धाया गोवारी, राष्ट्रवादीचे चंद्रकांत नवले, जयश्री देसाई, शेकापच्या जिजा फावडे, गीता उंडे, शिवसेना महिला आघाडीच्या संगीता राऊत, सुवर्णा वाळुंज आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आ. बाळाराम पाटील यांनी सांगितले, आज आम्ही सिडकोला निवेदन दिल्यानंतर त्यांनी या भागाचा पाणीपुरवठा येत्या 30 ऑक्टोबरपर्यंत सुरळीत करू असे आश्‍वासन दिले आहे. जर त्यांनी हे आश्‍वासन पूर्ण केले, तर त्यांचा आम्ही जाहीर सत्कार करू.
कामोठे शहर झपाट्याने वाढत आहे. येथे मुंबई परिसरातून नागरिक स्थलांतरित होत आहेत. असे असताना सिडकोकडून पूर्वी या विभागाला 40 एमएलडी पाणी मिळत होते. काही काळानंतर या विभागाला 35 एमएलडी पाणी मिळत होते; परंतु सिडकोने आणखी पाणीकपात करत गेल्या तीन महिन्यांपासून 27 ते 29 एमएलडी पाणी देत आहे. यामुळे कामोठेमधील नागरिक पाण्यासाठी वणवण करीत आहेत. तेव्हा हा पाणीपुरवठा सुरळीत करावा, असे आवाहन करण्यात आले. या मोर्चात कामोठेमधील महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पनवेल महानगरपालिकेच्या गेल्या चार महासभेत कामोठेतील रस्त्यांची दुर्दशा आणि ड्रेनेज लाईनचे सांडपाणी रस्त्यावर येत असल्याबाबत प्रश्‍न विचारले. अद्याप याबाबत आयुक्त आणि महापौर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला नाही.
शंकर म्हात्रे, नगरसेवक

Exit mobile version