प्रलंबित मागण्यांसाठी महिला परिचारिकांचे जिल्हा परिषदेसमोर धरणे

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्ह्यातील महिला परिचारिकांनी (अर्धवेळ) विविध अडचणी व मागण्यांबाबत प्रशासनाकडे यापुर्वी वेळोवेळी निवेदन सादर केले आहे. मात्र अद्यापही त्यांच्या मागण्या सोडविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे परिचारिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी (दि.23) जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.

या आंदोलनाचे नेतृत्व महिला परिचर संघटनेच्या जिल्हा अध्यक्ष ललिता दिवेकर यांनी केले. यावेळी सरचिटणीस रेश्मा ठाकूर, तसेच राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संदीप नागे, सरचिटणीस प्रभाकर नाईक, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष परशुराम म्हात्रे, महिला परिचर संघटनेच्या अश्‍विनी म्हात्रे, शोभा भगत, शैलजा भोईर, हर्षदा खारकर, मिनाक्षी पाटील, प्रणाली मोहिते आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तळागाळातील कर्मचारी असलेल्या महिला परिचारिका खेडयापाडयातुन कोणतीही सुविधा नसताना, तुटपुंज्या मानधनावर आरोग्य विभागातील नेमुन दिलेले काम तसेच रुग्णसेवा करीत आहेत. मात्र त्यांच्या समस्या सोडविल्या जात नाहीत. वेळोवेळी मागणी करुनही सरकार दुर्लक्ष करीत असल्याने अखेर त्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले.

त्यांच्या प्रलंबित मागण्यांमध्ये मानधन दरमहा व वेळेत मिळणे, महिन्याच्या 5 तारखेपर्यंत मानधन नियमित मिळावे, किमान वेतन 18 हजार रुपये देण्यात यावे, ग्रामपंचायत स्तरावरील महिला परिचारिकांना (अर्धवेळ) प्रोत्साहनपर भत्ता देणे, गणवेश, छत्री, टॉर्च, बूट इत्यादी साहित्याचा पुरवठा करणे, सरकारी कर्मचार्‍यांप्रमाणे पेन्शन, विमा कवच देणे आदी विविध मागण्यांचा समावेश आहे.

याबाबत सरकारने गांभीर्याने लक्ष देत न्याय देण्याची मागणी यावेळी परिचारिकांनी केली. या आंदोलनाला रायगड जिल्हा राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद कर्मचारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समितीने सक्रीय सहभाग व पाठींबा दिला.

Exit mobile version