साळाव-तळेखार रस्त्यावर ठिय्या आंदोलन

शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाची आक्रमक भुमिका

| रेवदंडा | प्रतिनिधी |

साळाव ते तळेखार रस्त्याची अत्यंत दुरावस्था झालेली आहे. हा 13 किमीचा रस्ता सहा महिन्यांपासून खोदून ठेवलेल्या स्थितीत आहे. दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे अत्यंत जिकरीचे झाले आहे. त्यामुळे नागरिकांचा संताप उसळला आहे. या दुरावस्थेबाबत एमएसआयडिसी व कंत्राटदारावर संप्तत प्रतिक्रिया व्यक्त करत साळाव बिर्ला मंदिर येथे शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षातर्फे सोमवारी (दि.18) ठिय्या आंदोलन छेडण्यात आले.

हे आंदोलन शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली, उपजिल्हाप्रमुख प्रशांत मिसाळ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजेश्री मिसाळ, मुरूड तालुकाप्रमुख नवशाद दळवी, युवासेना तालुकाप्रमुख किशोर काजारे, चणेरा विभाग प्रमुख मनोज तांडेल, चोरडे सरपंच तृप्ती घाग, साळाव सरपंच वैभव कांबळे, मिठेखार सरपंच अशोक वाघमारे, नागाव माजी सरपंच नंदकुमार मयेकर, विशाल तांबडे, रमेश गायकर, सनी ठाकूर यांच्यासह कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने भर पावसात रस्त्यात बसून छेडले.

यापूर्वी राजश्री मिसाळ यांनी साळाव ते तळेखार रस्ताच्या दुरावस्थेबाबत रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षकांना निवेदनाद्वारे दिला होता. त्यानुसार सोमवारी भर पावसात उपस्थित जमावाने रास्ता रोको आंदोलन छेडले. यावेळी प्रशांत मिसाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना, एमएसआयडिसी व कंत्राटदार यांच्या मनमानी व पोलिसांना हाताशी धरून चालविलेल्या दहशतीच्या विरोधात स्फोटक व्यक्तव्ये केली. तसेच, काम सुरू होईपर्यंत रूग्णवाहिका तैनात ठेवावी, अशी मागणी लावून धरली. राजश्री मिसाळ व युवासेना अध्यक्ष किशोर काजारे यांनी देखील एमएसआयडिसी व कंत्राटदार यांच्या भोंगळ कारभाराबाबत हल्लाबोल केला.

आंदोलनादरम्यान नागरिकांचे निवेदन एमएसआयडिसीचे मुख्य अधिकारी एम.के. सिंग यांना देण्यात आले. नागरिकांनी गणेशोत्सवाआधी सर्व खड्डे भरून रस्ता वाहतुकीसाठी खुला करावा, डिसेंबर 2025 पूर्वी संपूर्ण महामार्गाचे काँक्रिट काम पूर्ण करावे, कामादरम्यान अभियंता उपस्थित असावा, प्रतिबिंबक व सूचना फलक लावावेत आणि कुचराई झाल्यास व कंत्राटदार जबाबदार धरावा, अशा ठोस मागण्या केल्या. यावर सिंग यांनी 23 ऑगस्टपर्यंत काम पूर्ण करण्यात येईल, अशी हमी दिली आहे. तसेच, मागण्या पुर्ण करण्यास दुर्लक्ष केल्यास नवरात्रीच्या आधी यापेक्षाही मोठ्या स्वरूपाचे आंदोलन छेदण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Exit mobile version