‌‘सनबर्न फेस्टिवल’ रद्द करण्यासाठी आंदोलन

| उरण | प्रतिनिधी |

‘सनबर्न फेस्टिवल’ भारतात नेहमीच वादग्रस्त राहिलेला आहे. हाच कार्यक्रम गोव्यासह विविध ठिकाणी हद्दपार झाल्यानंतर यावर्षी मुंबईत शिवडी येथे 19 ते 21 डिसेंबर 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. अंमली पदार्थांचे अतीसेवन, युवकांचे मृत्यू यांसाठी कुप्रसिद्ध असलेला ‘सनबर्न फेस्टिवल’ या कार्यक्रमाला नवी मुंबईतूनही विरोध होत आहे. नशाविरोधी संघर्ष अभियानाच्या वतीने नेरुळ रेल्वे स्थानकाबाहेर युवक आणि राष्ट्र प्रेमी नागरिकांनी आंदोलन करत विरोध केला. यावेळी आंदोलनात युवक आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांसह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, माता अमृतानंदमयी मठ-नेरुळ, सनातन संस्था, हिंदू जनजागृती समिती यांचे पदाधिकारी यांनी सहभाग घेतला. ‘सनबर्न हटवा – देश वाचवा’, ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम’, छत्रपती शिवाजी महाराज की जय’ अशा घोषणा यावेळी आंदोलनात देण्यात दिल्या. आंदोलकांनी ‘सनबर्न’ला विरोध करणारे फलक हातात धरले होते. यावेळी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या स्वाक्षरी मोहिमेत अनेक नागरिकांनी स्वाक्षरी करून आपला विरोध दर्शवीला. शासनाचा कर बुडवणाऱ्या आणि तरुण पिढीला नशा करायला उद्युक्त करणाऱ्या ‌‘सनबर्न फेस्टिव्हल’ला प्रशासनाने अनुमती का दिली? हा प्रश्न या आंदोलनात उपस्थित करण्यात आला असून ‌‘सनबर्न फेस्टिव्हल’ छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्र भूमीतून, तसेच देशातूनच कायमचा हद्दपार करावा अशी मागणी ‘नशा विरोधी संघर्ष अभियाना’ने केली आहे.

Exit mobile version