। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
जंतर मंतर येथे सीजेपीच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू ठेवली आहे. राजधानीच्या विविध भागातून आंदोलकांना ताब्यात घेतले जात आहे. या धरपकडीत अनेक प्रमुख व्यक्तींचा समावेश आहे, ज्यामुळे नागरिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.
दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान दिल्ली पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांना ताब्यात घेतले आहे. सीजेपीच्या आंदोलकांवर सकाळपासूनच दिल्ली पोलिसांकडून कारवाई सुरू करण्यात आली होती, ज्यामध्ये काही प्रमुख नेत्यांनाही ताब्यात घेण्यात आले होते.
युट्युबर ध्रुव राठी यांना आंदोलनापूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याचबरोबर, अभिजीत दिपके यांना तर विमानातूनच थेट ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. याव्यतिरिक्त, रत्ना सिंग, सौरव दास आणि आशुतोष रांका यांसारख्या इतर महत्त्वाच्या कार्यकर्त्यांनाही दिल्ली पोलिसांनी आधीच अटक केली होती. आंदोलक जंतर मंतर येथे एकत्र येण्यास सुरुवात करत असतानाच, दिल्ली पोलिसांनी तात्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. आंदोलक आक्रमक झाल्याचे दिसून आले, मात्र पोलिसांनी बसेसमधून थेट आंदोलकांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेले. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असल्याचे दिल्ली पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या धरपकडीमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधक सध्या प्रचंड आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून कालच ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह इतर काही नेत्यांसोबत राष्ट्रपतींची भेट घेतली होती. आंदोलकांची धरपकड सुरू असताना, विरोधकांचा आक्रमक पवित्रा कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड सुरू असतानाच ममता बॅनर्जी यांना ताब्यात घेतल्याने राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
