| नवी दिल्ली | वृत्तसंस्था।
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी देशाची राजधानी दिल्ली आंदोलनाने आणि पोलिसांच्या लाठीमाराने हादरली आहे. ‘नीट’ पेपर लीक प्रकरण आणि देशातील वाढत्या बेरोजगारीविरोधात कॉकरोच जनता पार्टीने पुकारलेल्या’चलो संसद’ मोर्चात हजारोंच्या संख्येने विद्यार्थी-युवक रस्त्यावर उतरले आहेत. आज सकाळी झालेल्या लाठीमारानंतर विद्यार्थी अधिकच आक्रमक झाले आहेत. काही आंदोलक संसदेजवळ पोहचले असल्याचे वृत्त आहे. सुरक्षा दलाने संसदेचे प्रवेशद्वार बंद केले आहे. तर, रेल भवनजवळ अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या आहेत. तर, संसदेचे प्रवेशद्वार बंद करण्यात आल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधान निवासस्थानी दाखल झाल्याचे वृत्त आहे.
संसदेच्या दिशेने कूच करणाऱ्या हजारो संतप्त आंदोलकांनी दिल्लीतील सुरक्षा यंत्रणेने उभारलेले बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला. यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलांनी संसद मार्ग परिसरात आंदोलकांवर जोरदार लाठीचार्ज केला. या घटनेमुळे संपूर्ण जंतरमंतर आणि संसद मार्ग परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार सकाळी 11.25च्या सुमारास हाय-सिक्युरिटी झोनमध्ये हजारो आंदोलक जमा झाले. संसदेला वेढा घालण्याच्या इराद्याने आलेल्या या आंदोलकांनी पोलिसांनी लावलेले एकापाठोपाठ एक अनेक बॅरिकेड्स हटवण्यास आणि ते ओलांडून पुढे जाण्यास सुरुवात केली. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, आंदोलनकर्ते आणि पोलिसांमध्ये तीव्र झटापट झाली. या धुमश्चक्रीत काही आंदोलक आणि पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले
