कांद्याला योग्य हमीभाव द्या

| नाशिक | प्रतिनिधी ।

कांद्याला सध्या प्रति क्विंटल 200-300 रुपये एवढा कमी भाव मिळत असून, कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आजच्या विदारक परिस्थितीस भाजपाचे केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच जबाबदार आहे, असा हल्लाबोल करत शेतकऱ्यांच्या कांद्याला भरीव हमीभाव मिळाल्याशिवाय काँग्रेस पक्ष व महाविकास आघाडी स्वस्थ बसणार नाही, सरकारला सळो की पळो करून सोडू, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. कांद्याला 3 हजार रुपये हमीभाव मिळावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील चांदवड चौफुली येथे महाविकास आघाडीच्या वतीने शेतकरी क्रांती महामोर्चा काढण्यात आला. यावेळी रास्ता रोकोही करण्यात आला. या शेतकरी महामोर्चात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे (श.प.) प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे, शिवसेना (उबाठा) आमदार अंबादास दानवे, आमदार रोहित पवार, खा. शोभाताई बच्छाव, खा. भगरे गुरुजी, नाशिक ग्रामीण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष भारत टाकेकर, रमेश कहांडोळे, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष बबलू खैरे तसेच महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Exit mobile version