शुद्ध पाणी द्या; अन्यथा पाणीपट्टी माफ करा!

पेणकरांच्या आरोग्याशी खेळ थांबवा

| पेण | प्रतिनिधी |

पेण शहरात दर पावसाळ्यात गढूळ, अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त पाणीपुरवठ्याची समस्या कायम असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते इंजि. जीवन शंकर पाटील यांनी केला आहे. नागरिकांना शुद्ध व पिण्यायोग्य पाणी देता येत नसेल, तर संपूर्ण शहराची पाणीपट्टी माफ करावी किंवा त्यामध्ये सवलत द्यावी, अशी मागणी त्यांनी नगरपरिषदेकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, अनेक वर्षांपासून नागरिकांना दूषित पाणीपुरवठ्याचा सामना करावा लागत असून आंदोलने, निवेदने आणि सातत्याने तक्रारी करूनही या प्रश्नाकडे दुर्लक्ष होत आहे. विशेषतः 6 जुलैपासून सुरू झालेल्या पावसाळ्यात नळातून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी येत असल्याने लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसह सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 अंतर्गत सुरक्षित व शुद्ध पिण्याचे पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचे नमूद करत, नियमित पाणीपट्टी आकारूनही दर्जेदार सेवा मिळत नसल्याने हा नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचा भंग असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

पाणी शुद्धीकरण केंद्र, जलवाहिन्या आणि वितरण व्यवस्थेची उच्चस्तरीय तांत्रिक चौकशी करून दोष दूर करावेत, पिण्याच्या पाण्याची नियमित प्रयोगशाळा तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावेत आणि भविष्यात अशी परिस्थिती निर्माण होणार नाही, यासाठी कायमस्वरूपी कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणीही जीवन पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version