नादुरुस्त क्रीडा संकुलासाठी निधी उपलब्ध करा

माजी आ. पंडित पाटील यांची मागणी

| अलिबाग | प्रतिनिधी |

अलिबागसह रायगड जिल्ह्याची शान असलेल्या जिल्हा क्रीडा संकुलाचा खेळाडूंपेक्षा निवडणुकांच्या कामासाठी जास्त वापर केला जात आहे. त्यामुळे हे संकुल दुर्लक्षित झाल्याने खेळाडू सुविधांपासून वंचित राहू लागले आहेत. नादुरुस्त संकुलाच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या व अन्य मार्गाने निधी उपलब्ध करा, अशी मागणी माजी आ. पंडित पाटील यांनी प्रशासनाकडे केली आहे.


अलिबागसह रायगड जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी दहा वर्षापूर्वी नेहुली या ठिकाणी कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्हा क्रीडा संकुल बांधण्यात आले. मात्र या क्रीडा संकुलाच्या परिसराला गवताने विळखा घातला असून अनेक ठिकठिकाणी वेगवेगळ्या वस्तूंची पडझड झाली आहे. प्रेक्षक गॅलरी खराब झाली आहे. इनडोअर खेळाची इमारत जीर्ण झाली आहे. या संकुलामध्ये पूर्ण वेळ अधिकाऱ्यांचा अभाव आहे. तालुका क्रीडा अधिकाऱ्यांच्या भरवशावर कामकाज चालत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंची फार मोठी निराशा होऊ लागली आहे. या क्रीडा संकुलाचा वापर खेळाऐवजी फक्त निवडणुकींच्या कामासाठी जास्त केला जात आहे.


रायगड जिल्ह्याला कबड्डी व कुस्तीची पंढरी म्हणून ओळखले जाते. या खेळांमधून अनेक खेळाडू व मल्ल तयार झाले आहेत. मात्र त्यांना सुसज्ज अशा सुविधांसह क्रीडा संकुल नसल्याने हक्काचे व्यासपीठ मिळत नाही. जिल्हा क्रीडा संकुलाच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाल्याने हे संकुल व्हेंटिलेटरवर असल्याचे चित्र समोर येत आहे. जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. जिल्हा नियोजन व अन्य मार्गातून निधी उपलब्ध करून या संकुलाची दुरुस्ती करावी अशी मागणी पंडित पाटील यांनी केली आहे.

Exit mobile version