अलिबागमध्ये घनकचरा प्रकल्पासाठी निधीची तरतूद करा

आ. जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

। अलिबाग । प्रतिनिधी ।

अलिबाग शहरातील घनकचरा समस्येबाबत आ. जयंत पाटील यांनी विधान परिषदेत बुधवारी सकाळी साडे दहा वाजता आवाज उठवला. आ. जयंत पाटील म्हणाले की, अलिबाग नगरपरिषद हद्दीत असलेल्या घनकचऱ्याचा प्रश्न जागेभावी दिवसेंदिवस गहन होत चालला आहे. या संदर्भात वारंवार सभागृहात मुद्दा उपस्थित करण्यात आला असतानाही शासनाकडून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

अलिबाग शहराच्या लगत असलेल्या ग्रामपंचायती त्यांच्या हद्दीत घनकचरा टाकून देत नाहीत. घनकचरा हा वन विभागाच्या जागेत टाकायला परवानगी द्या, अशी देखील विधान परिषद सभागृहामध्ये मागणी केली होती. त्याअनुषंगाने अलिबाग शहरातील घनकचऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पालकमंत्री तथा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे राबविण्यात घनकचरा प्रकल्पाच्या धर्तीवर अलिबाग येथे घनकचरा प्रकल्प राबविण्यात येवून या प्रकल्पाला लागणारा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही आश्वासनाची पूर्तता करण्यात आली नसल्याचे आ. जयंत पाटील यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. रत्नागिरी येथे राबविण्यात आलेल्या घनकचरा प्रकल्पाच्या धर्तीवर अलिबाग येथे घनकचरा प्रकल्प तात्काळ उभारण्यात यावा. तसेच, त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यात यावी, अशी जोरदार मागणी आ. जयंत पाटील यांनी केली.

जिल्हयातील अलिबाग, मुरूड, रोहा, खालापूर या नगरपरिषदेमध्ये मोठया प्रमाणात शहरीकरण झाले असून या नगरपरिषदेंना मोठया प्रमाणात मुलभूत सोयी-सुविधा पुरवणे अत्यंत गरजचे आहे. अलिबाग नगरपरिषदेला 75 वर्षे पुर्ण झाले असून अलिबाग, मुरूड हे पर्यटन ठिकाण म्हणून शासनाने घोषित केले आहे. अलिबाग नगरपरिषदेला वैशिष्टपूर्ण निधीचा एकही रूपया न देण्याचा राज्य शासनाने विक्रम केला असल्याची टीका आ. जयंत पाटील यांनी केली. तसेच, रायगड जिल्हयातील अलिबाग, मुरूड, रोहा, खालापूर या नगरपरिषदेला वैशिष्टयपूर्ण योजनेतून मुलभूत सोयी-सुविधा पुरविण्याकरिता तात्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे ही ते म्हणाले.

एस.टी. आगार रखडलेलेच
अलिबाग हे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण असून पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील अलिबागची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. अलिबागमध्ये नोकरी व्यवसायानिमित्त येणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. रायगड जिल्हयाची राजधानी म्हणून अलिबागकडे पाहिले जात असून पर्यटनाच्या दृष्टीने अलिबाग येथे दररोज हजारो पर्यटकांची ये-जा सुरू असते. अलिबाग हे मुख्यालय असल्यामुळे शासकीय व निमशासकीय कार्याल अलिबाग येथे असल्याने येणाऱ्या प्रवाशांची सर्व सोयीयुक्त आगाराचा विकास होणे गरजेचे होते. परंतु, अलिबाग एस.टी. आगाराच्या इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले आहे. 27 ऑगस्ट 2019 मध्ये अलिबाग बस स्थानकांच्या नुतनीकरणाच्या कामाचे भूमीपूजन तत्कालीन परिवहन मंत्री यांच्या हस्ते झाले होते. मात्र, चार वर्ष होत आली तरी सुध्दा या आगाराचे निधी अभावी काम रखडलेले आहे. तरी राज्य शासनान अलिबाग आगार बस स्थानक हे सुसज्ज करण्याच्या दृष्टीने आवश्यक तो निधी उपलब्ध करून रखडलेले काम तात्काळ सुरू करण्याची मागणी आहे.
सुरक्षा रक्षकांच्या वेतनात वाढ करा
रायगड जिल्ह्याला भला मोठा समुद्रकिनारा लाभल्याने या समुद्रातून अनेक नौकांमधून साधनसामुग्रीची वाहतूक केली जाते. अनेक नौका परराज्यातून येतात. परंतू गेल्या वर्षापासून अनेक दहशतवादी वातावरण निर्माण जाले आहे. अंमली पदार्थांची तस्करी सागरी मार्गाने होत असल्याचे पोलीस यंत्रणेच्या तपासात उघडकीस आले आहे. अंमली पदार्थ तस्करी रोखण्यासाटी सोयी सुविधा यंत्रणेसह सागरी गस्ती नौका तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात. तसेच, सुरक्षा रक्षकांना कायम स्वरुपी करावे. अथवा त्यांच्या वेतनात वाढ करण्याची मागणी आ. जयंत पाटील यांनी सभागृहात केली.
Exit mobile version