केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना साकडे
। नागोठणे । वार्ताहर ।
नागोठणे शहरालगत असलेला वरवठणे ऐतिहासिक पुलाची बिकट अवस्था झाली असून, तो पूल जर कोसळला, तर फार मोठी जीवितहानी होण्याचा संभव आहे. भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष किशोर म्हात्रे यांनी या पुलाच्या बांधकामासाठी निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना एका निवेदनाद्वारे केली आहे.
काही दिवसांपूर्वी रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथे एका कार्यक्रमासाठी नितीन गडकरी उपस्थित होते. त्यावेळी किशोर म्हात्रे यांनी ना. गडकरी यांना एका निवेदनाद्वारे साकडे घातले आहे. आपल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहारा लगत असलेला वरवठणे ऐतिहासिक शिवकालिन पुलाची 500 ते 550 वर्षांपूर्वीच्या इतिहासात नोंद आहे. या पुलावरुन अनेक वर्षे अवजड वाहने येत-जात आहेत. या पुलाला प्रत्येक वर्षी पावसाळ्यात महापुराचे मोठ मोठे फटके बसल्यामुळे या पुलाची अवस्था बिकट झालेली आहे. हा पूल नादुस्त झाल्यामुळे मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आम्ही महाराष्ट्र शासनाकडे अनेकवेळा पत्र व्यवहार करुनही काही उपयोग झालेला नाही. या पुलाचे नव्याने बांधकाम होण्यासाठी रोहा तालुक्यात येणार्या ग्रामपंचायतींकडून ग्रामसभेत ठराव देखील करण्यात आला आहे, असे शेवटी किशोर म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे.