नुकसानग्रस्तांना तातडीने मदत द्या – शेकाप

। कोर्लई । वार्ताहर ।
बोर्लीमध्ये ढगफुटीसदृश्य अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या घटनेला महिना झाला तरी अद्यापही नुकसानग्रस्त मदतीपासून वंचित असून, शासनाकडून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन शेकापचे तालुका चिटणीस मनोज भगत व बोर्ली ग्रामपंचायत सरपंच चेतन जावसेन यांनी मुरुड तहसीलदारांना दिले. या निवेदनात म्हटले आहे की, दि.6 सप्टेंबर रोजी बोर्ली परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश्य अतिवृष्टी होऊन अचानक आलेल्या पुरामुळे गावातील जुना स्टँड, जुना बाजार, मोहल्ला परिसरात पुराचे पाणी घुसून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. दि.7 सप्टेंबर रोजी महसूल विभागाच्या पथकासोबत आम्ही घरोघरी जाऊन पंचनामे करून देण्यात आले असून, पुरामुळे झालेले नुकसान अत्यंत वेदनादायी आहे. गणेशोत्सव ऐन तोंडावर असताना अनेक व्यापा-यांनी दुकानात भरलेल्या सामानाचे पूरामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे तसेच बोर्ली खाडीत नांगरुन ठेवलेल्या बोटींचे, जाळ्यांचे नुकसान झाले आहे. शासनाच्या संबंधित अधिकार्‍यांकडून सदर नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत, असे ग्रामपंचायतीतर्फे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले असून, नुकसानग्रस्तांना तातडीने मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस तथा नगरपरिषदेचे नगरसेवक मनोज भगत, सहचिटणीस सी.एम.ठाकूर,बोर्ली ग्रामपंचायत सरपंच चेतन जावसेन, उपसरपंच मतीन सौदागर, पंचायत समितीचे माजी सभापती चंद्रकांत कमाने, रमेश नागांवकर, कुणबी समाज तालुका अध्यक्ष संतोष पाटील, अ‍ॅड. मोहिनेश ठाकूर, विकास दिवेकर, युवा नेते मनोहर भोपी, विद्यार्थी संघटना अध्यक्ष विनायक चोगले, राहिल कडू, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Exit mobile version