जिल्हाधिकारी कार्यालयावर कोळी समाजाचा मोर्चा
| अलिबाग | प्रतिनिधी |
अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्र देण्यात यावे, पावसाळ्यात मासेमारीविषयक कार्यशाळेचे शिबीर आयोजित करणे, अशा अनेक मागण्यांसाठी कोळी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा मंगळवारी काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने कोळी समाज एकवटला.
राज्य सरकार 1976 पासून कोळी महादेव, डोंगर कोळी, कोळी मल्हार, कोळी ढोर, टोकरे कोळी या अनुसूचित जमातींबाबत उघडपणे अनास्था दाखवत असून, अनुसूचित जमातीचे कोणतेही लाभ मिळू नये यासाठी सतत प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जाचक अटी लागू करून कोळी समाजाला सुविधांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. दिलेले प्रमाणपत्र तपासणीचे नाटक करून ती रद्द करण्याचा घाट सरकारने घातला आहे. त्याचा नाहक त्रास कोळी समाजाला मोठ्या प्रमाणात होत आहे. वारंवार अर्ज विनंत्या करूनदेखील सरकार याकडे लक्ष देत नाही. अधिकार, हक्क व लाभ मिळत नसल्याने पुन्हा सरकारचे लक्ष वेधण्यासाठी अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मंगळवार (दि.23) रोजी मूक मोर्चा कोळी समाजाने काढला. या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी राज्यव्यापी महाआंदोलन समितीचे सहकार्याध्यक्ष जलदीप तांडेल यांच्यासह अनेक प्रमुख मंडळींनी मार्गदर्शन केले.