| नवीन पनवेल | प्रतिनिधी |
रा.जि.प.ची उच्च प्राथमिक शाळा मोरबे, तालुका पनवेल येथे पनवेल तालुक्याचे पोलीस निरीक्षक इंगोले व त्यांचे सहकारी तसेच उपनिरीक्षक पी. डी. पवार व त्यांचे सहाय्यक राऊत यांनी पोलीस वर्धापनदिन सप्ताह निमित्ताने शाळेस भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधत मार्गदर्शन केले. या कार्यक्रम प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती मोरबे चे अध्यक्ष बबन रामजी उलवेकर हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. पोलीस वर्धापन दिन सप्ताह निमित्ताने विद्यार्थ्यांना सायबर क्राईमपासून स्वतःचे रक्षण, महिला सुरक्षितता मोहीम, मोबाईलचा योग्य वापर कसा करावा व मुलांवर होणारे अत्याचार याविषयी माहिती दिली. तसेच राऊत यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन का व कसे करावे याचे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी चांगला नागरिक बनण्यासाठी प्रामाणिकपणा, कष्ट व देशभक्ती जोपासावी असे आवाहन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना पीएसआय यांनी समर्पक अशी उत्तरे देत मुलांचा उत्साह वाढवला. या कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता साळवी व सर्व शिक्षक उपस्थित होते. साळवी यांनी इंगोले, पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायदा व सुव्यवस्थेबाबत जागरूकता निर्माण झाली असून, सर्व ग्रामस्थ व पालकांनी या मार्गदर्शनाचे कौतुक केले आहे.







