चवदार तळ्याच्या विकासासाठी निधीची तरतूद

| महाड | प्रतिनिधी |

चवदार तळ्याच्या विकासासाठी निधीची तरतूद केली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाड येथे दिली. खेड येथे पक्षाची सभा आटोपून परतीच्या प्रवासाला लागलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाड शहरात रात्री उशिरा भेट दिली. चवदारतळे सत्याग्रह स्मृतिदिनानिमित्त त्यांनी चवदारतळे येथे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. यावेळी त्यांच्यासमवेत पालकमंत्री उदय सामंत, आमदार भरत गोगावले, योगेश कदम, रिपाईंचे सिद्धार्थ कासारे, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजबिये, पोलीस अधीक्षक सोमनाथ गार्गे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या सामाजिक क्रांतीमुळे शोषित पीडितांना न्याय मिळाला, यामुळे या चवदारतळ्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. या चवदार तळ्याच्या विकासासाठी निधीची तरतूद केली जाईल, असेही स्पष्ट केले. याशिवाय अमृतसर येथील सुवर्णमंदिर परिसरातील तलावाच्या धर्तीवर चवदार तळ्याचेही सरकारकडून सुशोभिकरण केले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले. यावेळी ते सामूहिक बुद्धवंदनेत सहभागी झाले होते.

सामाजिक समतेसाठी विचारांची गरज- आंबेडकर
देशात सद्यःस्थितीत वाईट परिस्थिती असून, देशातील नागरिकांना पुन्हा गुलाम करून आपली सत्ता स्थापन करण्याचा डाव रचला जात आहे. धार्मिक तेढ निर्माण केली जात असून, धर्माच्या नावावर राजकारण केले जात आहे. पैशाने मत विकत घेतले जात असल्याने लोकशाहीदेखील धोक्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी वेळीच जागे झाले पाहिजे. देशात सामाजिक समतेचा पाया रचण्याचे काम महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असून, या सामाजिक समतेसाठी आणि संविधान अबाधित राखण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याच विचारांची गरज असल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी महाडमध्ये केले.

Exit mobile version