मतदारांनो, बिनधास्त मतदानाला जा!

मतदान केंद्रांवर औषधांची व्यवस्था

। अलिबाग । प्रमोद जाधव ।

मे महिना सुरू होताच सूर्य अक्षरशः आग ओकत असून, जिल्ह्यातील तापमानाने चाळिशी गाठली आहे. त्यातच उद्या मंगळवारी लोकसभा निवडणुकीसाठी तिसर्‍या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. दरम्यान, वाढत्या तापमानाच्या पार्श्‍वभूमीवर मतदारांची काळजी घेण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने मतदान केंद्रांवर ग्लुकोज डी, ओआरएससह बीपी, शुगर व इतर औषधे देण्याची व्यवस्था केली आहे. त्यासाठी आशा वर्करसह आरोग्य कर्मचार्‍यांची नेमणूकसुद्धा करण्यात आली असून, ते मतदारांची काळजी घेणार आहेत. त्यामुळे मतदारांनी मतदानासाठी बिनधास्त बाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

रायगड लोकसभा मतदारसंघातील मतदान मंगळवारी (दि. 07) मे रोजी दोन हजार 185 केंद्रांमध्ये होणार आहे. 16 लाख 68 हजार 372 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान केंद्रावर येणार्‍या मतदारांच्या आरोग्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभाग सज्ज झाला असून, प्रथमोपचारासह आशा सेविकांसह आरोग्य कर्मचार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे मतदानाला बिनधास्त या, असे आवाहन जिल्हा परिषदेकडून करण्यात आले आहे. जिल्ह्यामध्ये तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. उन्हाचा पार चढत आहे. उन्हाचे चटके बसत असल्याने बाहेर पडणेदेखील नकोसे झाले आहे. मात्र, सात मे रोजी केंद्रामध्ये मतदान करण्यास जाणार्‍या मतदारांच्या सेवेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती देण्यात आली आहे.

मतदान केंद्रावर रांगेत उभे राहणार्‍यांना उन्हाचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी ओआरएस पावडर, इतर औषधांचा साठा उपलब्ध करण्यात आला आहे. दोन हजार 85 केंद्रांवर प्रथमोपचार कीट ठेवण्यात आले आहेत. या केंद्रावर आरोेग्य कर्मचारी, आशा वर्कर व समन्वय वैद्यकीय अधिकार्‍यांची नेमणूक करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 54 प्राथमिक आरोग्य केंद्रांसह उपजिल्हा रुग्णालयातील यंत्रणांचे लक्ष राहणार आहेे. तसेच 108 सह 102 क्रमांकाची रुग्णवाहिकादेखील ठिकठिकाणी उपलब्ध असणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे यांनी दिली.

Exit mobile version