शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद
। अलिबाग । प्रतिनिधी ।
शाळकरी मुलांना मतदानाचे महत्त्व कळावे यासाठी अलिबाग तालुक्यातील नवेदर बेली येथील शाळेमध्ये मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त शाळेच्या परिसरात रॅली काढण्यात आली. या रॅलीला विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यातून मतदान करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांनी केले.
शालेय शिक्षणात व्यवहारज्ञानाचे धडे मिळणे हा एक शिक्षणाचा भाग आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले. यावेळी विद्यार्थ्यांना मतदानाचे महत्त्व कळावे या उदात्त विचारातून व पालकांनीही मतदानास चांगला प्रतिसाद द्यावा याकरिता केंद्रप्रमुख संदीप वारगे यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा परिषद शाळा नवेदर बेली शाळेच्या मुख्याध्यापिका दीपा फाळके आणि शिक्षक यांच्या माध्यमातून स्वीप कार्यक्रमांतर्गत मतदार जनजागृती अभियान रॅली काढण्यात आली.
मतदानाच्या दिवशी सुट्टी म्हणून बाहेर फिरायला न जाता, घरी न थांबून मतदान करावे, अशी भावनिक साद रॅलीच्या माध्यामातून घालण्यात आली. विविध घोषणा देऊन मतदानाचा जागर करण्यात आला. स्विप अंतर्गत शासनाच्या या अभियानातमार्फत तालुक्यात मतदानविषयक जनजागृती करण्यासाठी सर्वप्रथम विद्यार्थ्यांमार्फत आई, बाबा, ताई, दादा यांना पत्र देऊन मतदानाचे आवाहन करण्यात आले. या वेगळ्या उपक्रमाचे गावांतील नागरिकांनी जल्लोषात स्वागत केले.







