मालमत्ता कराविरोधात मोर्चाबाबत पनवेलमध्ये मविआतर्फे जनजागृती

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

पनवेल पालिका प्रशासनाने लादलेल्या मालमत्ता कर विरोधात महाविकास आघाडी तर्फे सोमवारी (दि.13) मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे या करता महाविकास आघाडीतील घटक पक्ष प्रयत्न करत आहेत. याचाच एक भाग म्हणून नागरिकांमध्ये जनजागृती केली जात आहे. कामोठे नोडमध्ये नागरिकांचा मालमत्ता कराला विरोध वाढत आहे. त्यामुळे माजी आ. बाळाराम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित बैठकींना नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे.

नागरिकांचा विरोध डावलून पनवेल महानगरपालिकेने मालमत्ता कर आकारणीचा निर्णय घेतला आहे. मालमत्ता कराची नोटीस प्राप्त झाल्यावर कामोठे नोडमधील नागरिकांनी सर्वप्रथम महानगरपालिका विरोधात विराट मूक मोर्चा काढून निषेध व्यक्त केला होता. यानंतर मालमत्ता कर रद्द करण्याच्या मागणीसाठी महानगरपालिका आयुक्तांना हजारो पोस्ट कार्ड पाठवणे, मालमत्ता कराची होळी करणे या प्रकारे शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरु ठेवले होते. महानगरपालिकेने मात्र नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले याबद्दल महाविकास आघाडीने येत्या 13 मार्चला मालमत्ता कर विरोधात महानगरपालिका मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचे निश्‍चित केले आहे. या मोर्चात महानगरपालिका हद्दीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी महाविकास आघाडीकडून आवाहन करण्यात येत आहे.

माजी आ. बाळाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली मानसरोवर कॉम्प्लेक्स, प्रतीक जेम्स, वृंदावन सोसायटी, साई प्रेरणा सोसायटी या ठिकाणी नुकतीच जनजागृती करण्यात आली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन पाटील, काँग्रेस नेते आर.सी.घरत, शेकाप पनवेल विधानसभा अध्यक्ष काशिनाथ पाटील, जिल्हा चिटणीस गणेश कडू, काँग्रेस पनवेल महानगरपालिका जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, माजी नगरसेवक शंकर म्हात्रे, माजी नगरसेवक प्रमोद भगत, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकुमार पाटील, नागरिक उपस्थित होते.

मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या ‘अ’ वर्गाच्या महापालिकापेक्षा ‘ड ‘वर्गातील पनवेल महानगरपालिकेचा मालमत्ता कर जास्त आहे. करोनामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तत्कालीन सत्ताधारी आणि महानगरपालिका प्रशासनाला नागरिकांच्या भावनेची जाणीव नाही.

अमोल शितोळे,अध्यक्ष शेकाप कामोठे शहर अध्यक्ष
Exit mobile version