| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेल येथील पिल्लई कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या एन. एस. एस. विभागातर्फे सडक सुरक्षा, जीवन रक्षा या संकल्पनेवर आधारित वाहतूक जनजागृती कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने, तुकाराम कदम, पोलीस हवालदार युवराज येळे, अमीर मुलाणी, ज्ञानेश्वर पवार, केशव निकम आणि हनुमंत आंधळे यांच्यासह इतर पोलीस अंमलदार उपस्थित होते. कार्यक्रमा दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांची सविस्तर माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक जीवन शेरखाने यांनी उपस्थित एन.एस.एस. स्वयंसेवकांना वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याची सामूहिक शपथ दिली. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत वाहतूक शिस्त, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, पादचारी सुरक्षा आणि वाहन चालवताना मोबाईल वापरण्याचे धोके याविषयी सखोल ज्ञान प्राप्त केले. कार्यक्रमाचे संपूर्ण नियोजन डॉ. शबाब रिझवी यांनी केले.







