प्रदर्शनाच्या माध्यमातून होणार जनजागृती

शासन आपल्या दारी कार्यक्रम माणगांवमध्ये होणार

| अलिबाग | प्रतिनिधी |

शासन आपल्या दारी हा कार्यक्रम माणगावमध्ये होणार आहे. राज्याचे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पाच जानेवारीला माणगावमध्ये होणार आहे. या कार्यक्रमामध्ये कृषी, मत्स्य, आरोग्य अशा वेगवेगळ्या विभागामार्फत प्रदर्शन भरवले जाणार आहे. यातून योजनांची माहिती देण्याबरोबरच आरोग्याबाबत असलेल्या समस्यांबाबात नागरिकांमध्ये जनजागृती केली जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे यांनी दिली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी 40 समित्या गठीत केल्या आहेत. या कार्यक्रमाला 40 हजार नागरिक येेण्याचे नियोजन केले आहे. 12 एकर क्षेत्रात मंडप असणार आहे. 40 एकरमध्ये पार्कींगची व्यवस्था केली आहे. दोन हजार चारचाकी वाहने राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. वेगवेगळ्या योजनेचा लाभ या कार्यक्रमानिमित्त लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.

या कार्यक्रमाचे औचित्य साधून एक एकर जागेमध्ये कृषी विभागाचे प्रदर्शन भरविले जाणार आहे. त्यामध्ये कृषी, पशुसंवर्धन व मत्स्य विभागाचे सुमारे 100 दुकाने असणार आहे. जिल्ह्यात रसायनयुक्त कंपन्या मोठ्या प्रमाणात आहेत. या कंपन्यांमुळे जिल्ह्यात धोका निर्माण झाला आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी एक एकर जागेत उद्योग संबधित प्रदर्शन भरविले जाणार आहेत. जिल्ह्यात सध्या लेप्टोस्पायरेसिसचा धोका निर्माण झाला आहे. शेतामध्ये विशेष करून चिखलात, नाल्यात काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी या आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी, प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांना गम बुट वाटप केले जाणार आहेत. यावेळी आरोग्य शिबीरदेखील घेतले जाणार आहे. ताप सर्दी खोकला या आजारांसह विशेष म्हणजे कॅन्सरवर निदान करण्यासाठी तपासणी केली जाणार आहे. या कार्यक्रमात येणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याचा विचार करून कोरोनाने जिल्ह्यात शिरकाव केला आहे. सध्या 20 रुग्ण सापडले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन केले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी दिली.

जिल्हा नियोजनमधून तीन कोटीची तरतूद
माणगावमध्ये होणाऱ्या कार्यक्रमासाठी कोट्यवधी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे. जिल्हा नियोजन समितीकडून तीन कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा नियोजन समितीकडून देण्यात आहे.

Exit mobile version