| नेरळ | प्रतिनिधी |
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 189 कर्जत विधानसभा मतदारसंघाची निवडणूक (दि.20) नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडणार असून, दिनांक 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. या मतदारसंघात एकूण 362 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडण्यात येणार आहे.
दि. 30 जून रोजी प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीनुसार कर्जत विधानसभा मतदारसंघात एकूण 3 लाख 13 हजार 884 मतदार भाग घेणार आहेत. त्यापैकी पुरुष मतदारांची संख्या 1 लाख 57 हजार 218 आहे. महिला मतदार 1 लाख 56 हजार 661 आहेत, तर 5 तृतीय पंथी मतदारांचा समावेश आहे. मतदारसंघातील आचारसंहितेचा भंग होणार नाही, यासाठी सर्व यंत्रणांच्या बैठका घेऊन करावयाच्या कार्यवाहीबाबत निर्देशित केले आहे. निवडणूक प्रक्रिया सुलभ आणि कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण न होता पार पाडण्याच्या दृष्टीने विविध पथकांची स्थापना करण्यात आली आहे. मतदारसंघांच्या सीमांवर चेक पोष्टची उभारणी करण्यात आली आहे. तसेच 24 टोल फ्री क्रमांक 1950 कार्यान्वित करण्यात आला आहे. 189 कर्जत विधानसभा मतदारसंघासाठी दि.22 ऑक्टोबरपासून नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय नवीन प्रशासकीय भवन येथे स्वीकारण्यात येतील. मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी स्वीप कार्यक्रम राबविण्यात येत आहे. विधानसभा निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द झाल्यापासून निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कर्जत मतदान करा, असे आवाहन असे प्रसिध्दी पत्रकाद्वारे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ यांनी जाहीर केले आहे.