। उरण । प्रतिनिधी ।
उरण येथील द्रोणागिरी औद्योगिक प्रशिक्षण संस्था, उरण येथे इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाच्या वतीने ‘तंबाखूमुक्ती युवा अभियान 3.0’ अंतर्गत जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात दातांचे डॉक्टर संतोष झापकर यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. झापकर यांनी तंबाखूचे विविध प्रकार, त्यातील अपायकारक द्रव्ये आणि तंबाखू सेवनामुळे होणारे मुख कर्करोग, फुफ्फुसांचे विकार, हृदयविकार, दात-हाडांचे नुकसान आदी गंभीर दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. व्यसनातून मुक्त होण्यासाठी आवश्यक उपाययोजना, समुपदेशनाची गरज आणि आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारण्याचे महत्त्व यावरही त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
शिबिरास संस्थेतील प्रशिक्षणार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तंबाखूमुक्त समाज घडवण्यासाठी युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. संस्थेच्या वतीने झापकर यांचे मार्गदर्शनाबद्दल आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी संस्थेचे प्राचार्य मा.व. पिल्ले, गट निर्देशक देशमुख, विद्यार्थी आदी उपस्थित होते.
तंबाखूमुक्ती युवा अभियान अंतर्गत जनजागृती
