सुधागडातील सार्वजनिक आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर

13 कर्मचारी गेलेत संपावर

| पाली/बेणसे | वार्ताहर |

राज्यातील आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडाला असताना रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुका आरोग्य सेवेच्या बाबतीत पिछाडीवर असल्याचे दिसून येते. धक्कादायक बाब म्हणजे पाली प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर असून देखील रिक्त आहेत. डॉक्टरच नसतील तर गर्भवती महिला, गंभीर रुग्णांवर उपचार करणार कोण? असा सवाल उपस्थित होत आहे. उर्वरीत 50 टक्के पदे ही रिक्त आहेत, तर कंत्राटी कर्मचाऱ्यांवर आरोग्य विभागाचा गाडा हाकला जात आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे 13 कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. संप लांबणीवर गेला तर नागरिकांची, रुग्णांची मोठी गैरसोय होणार आहे.

पाली प्राथमिक आरोग्य केंद्रावर साधारण 43 हजार 810 इतकी लोकसंख्या अवलंबून आहे. तर जांभुळपाडा प्राथमिक आरोग्य केंद्रावर साधारण 28 हजार 861 इतकी लोकसंख्या अवलंबून आहे. सुधागड तालुक्यात 108 गावे असून तालुक्यातील अनेक गावे दुर्गम भागात आहेत. सुधागड तालुक्यातील सार्वजनिक प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील मंजूर 57 पदांपैकी तब्बल 28 पदे रिक्त आहेत. अतिशय गंभीर बाब म्हणजे 5 वैद्यकीय अधिकारी मंजूर पदांपैकी 3 पदे रिक्त आहेत. यामुळे तालुक्यातील नागरिकांना वेळेवर योग्य उपचार मिळताना अडचणी येत आहेत. त्यांची गैरसोय होत आहे. शिवाय उपलब्ध डॉक्टर व कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण येत आहे.

तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या पाली शहरातील प्राथमिक केंद्रातील दोन्हीही वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत, तर जिल्हा परिषद दवाखाना खवली येथील 1 वैद्यकीय अधिकारी यांचे पद रिक्त आहे. या भागात सर्पदंशाचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत असतात मात्र उपकेंद्रामधील मोठ्या प्रमाणात पदे रिक्त असल्यामुळे रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या घटना घडतात. शिवाय गरोदर महिला, अपघातग्रस्तांना योग्य व वेळेवर उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. गरोदर महिलांना प्रसूतीसाठी सुद्धा अलिबागला जावे लागते. सुधागड तालुक्यातील नागरिकांसाठी अतिशय अत्यावश्यक असणाऱ्या आरोग्य सेवेचे तीन तेरा वाजले असून आरोग्य विभाग हे सद्यस्थितीत सलाईनवर आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्या या उदासीनतेच्याबाबत नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

रिक्त पदे
तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रातील आरोग्य सेविका 17 मंजूर पदांपैकी 13 रिक्त, आरोग्य सेवक 7 मंजूर पदांपैकी 5 रिक्त, औषध मिश्रक 3 मंजूर पदांपैकी 2 रिक्त, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 2 मंजूर पदांपैकी 1 रिक्त, शिपाई 4 मंजूर पदांपैकी 2 रिक्त, कुष्ठरोग तंत्रज्ञ 2 मंजूर पदांपैकी 2 दोन्ही पदे रिक्त, वैद्यकीय अधिकारी 5 मंजूर पदांपैकी 3 रिक्त असे एकूण 28 रिक्त पदे सुधागड तालुक्यातील सार्वजनिक आरोग्य विभागात आहेत.
लसीकरण औषधोपचार रखडतात
आरोग्य सेविकांची मंजूर 17 पदांपैकी तब्बल 13 पदे रिक्त असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. परिणामी सर्व प्रकारचे लसीकरण, पोलिओ डोस, विविध आजारांची नोंद व औषधोपचार, रोग प्रतिबंधक कामे, आरोग्य विषयक जनजागृती, आरोग्य शिक्षण, गरोदर स्त्रिया व विद्यार्थी यांची तपासणी, शासनाच्या विविध योजना तळागाळात पोहचविणे आदि कामे रखडतात व वेळेत होत नाहीत.
नाईलाजास्तव खाजगी रुग्णालयाचा आधार
सध्या सर्वत्र डेंग्यू, मलेरिया, टायफाईड अश्या आजारांची साथ सुधागड तालुक्यात आहे. तालुक्यात आदिवासी, कातकरी गोरगरीब कष्टकरी लोक आहेत. जे नागरिक आर्थिक सक्षम आहेत ते खाजगी रुग्णालयातून वेळेवर उपचार घेत आहेत. मात्र मोठ्या प्रमाणात असलेला गोरगरीब, खेड्यापड्यात दुर्गम भागात राहणारा आदिवासी बांधव हे शासनाने दिलेल्या आरोग्य सेवेवरच विसंबुन राहतात. परंतु रिक्त पदांमुळे तेथे त्यांना आरोग्य सेवा मिळत नाही. त्यामुळे नाइलाजास्तव त्यांना पदरमोड करून खाजगी रुग्णालयाचा रस्ता पकडावा लागत आहे. तर कधी पैशांअभावी उपचारांवर पाणी सोडावे लागत आहे.

सुधागड तालुक्यातील आरोग्य विभागातील रिक्त पदा संदर्भात दर महिन्याला लेखी अहवाल जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडे सादर करण्यात येतो. याबाबत सातत्याने पाठपुरावा करत आहोत. सद्यस्थितीत पाली प्राथमिक आरोग्य केंद्र व खवली जिल्हा परिषद दवाखान्यातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पदांचे काम राष्ट्रीय बाल संस्थेमधील वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने आरोग्य सेवा देणे सुरू आहे.

डॉ. शशिकांत मढवी, तालुका आरोग्य अधिकारी, सुधागड तालुका
Exit mobile version