मोर्ब्यात घुमणार ‘पॅावर’फूल ‘तुतारी’चा नाद

इंडिया आघाडीची जाहीर प्रचार सभा

। माणगाव । प्रतिनिधी ।

रायगड लोकसभा मतदारसंघात इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार मंगळवारी (दि.23) माणगाव तालुक्यातील मोर्बा येथे येणार आहेत. त्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही जाहीर प्रचार सभा मोर्बा येथील एस.एस. हायस्कूलच्या भव्य पटांगणात सायंकाळी चार वाजता होणार आहे. या प्रचार सभेत महायुतीचे उमेदवार तथा एक वेळचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सुनील तटकरे यांच्यावर काय झोड उठविणार याकडे संपूर्ण श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघबरोबरच रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. या सभेची जोरदार तयारी झाली असल्याचे शेकाप तालुका चिटणीस रमेश मोरे यांनी सांगून हजारोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

या सभेला प्रमुख वक्ते म्हणून शिवसेना नेते तथा माजी मंत्री सुभाष देसाई, शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील, शिवसेना नेत्या सुषमा अंधारे, गुहागरचे आ. भास्कर जाधव, दक्षिण रायगड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख संजय कदम, जिल्हाप्रमुख अनिल नवगणे, प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सचिव अनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस रायगड प्रभारी प्रशांत पाटील, राष्ट्रीय काँग्रेस नेते ॲड. प्रवीण ठाकूर, महाडच्या माजी नागराध्यक्ष स्नेहल जगताप, मुंबई काँग्रेसचे सेक्रेटरी मुफ्ती सुफियान वाणू, मराठा मुस्लिम सेवा संघाचे महम्मद फकीर ठाकूर, सामाजिक नेते इकबालशेठ धनसे, शेकाप नेते नानासाहेब सावंत आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या सभेला इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांनी व जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मोर्बा येथील शेकाप ज्येष्ठ नेते अस्लम राऊत, तालुका चिटणीस रमेश मोरे, ज्येष्ठ नेते सदानंद येलवे, अल्पसंख्याक सेल रायगड अध्यक्ष अमीन अधिकारी, शिवसेना माणगाव संघटक सीताराम मेस्त्री, शिवसेना मोर्बा विभाग प्रमुख मौलाना असिफभाई मनेर, शिवसेना रायगड संपर्क प्रमुख संजय साखळे, युवासेना माणगाव तालुका प्रमुख रणजित मालोरे, रायगड जिल्हा अल्पसंख्याक सेल सदस्य आसिफ हर्णेकर यांच्यासह इंडिया आघाडीचे कार्यकर्ते यांनी केले आहे. या सभेचे आयोजक म्हणून इंडिया आघाडी मोर्बाचे कार्यकर्ते काम पाहात आहेत.

अलिबागमधून निघणार हजारो कार्यकर्ते
महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांची प्रचारसभा मंगळवारी (दि.23) माणगावमध्ये होणार आहे. या प्रचार सभेला वेगवेगळे दिग्गज नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. त्या निमित्ताने अलिबागमधून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. माणगावला जाण्यासाठी तयारी जोरात सुरु आहे. काही कार्यकर्ते सकाळी दहा वाजता तर काही कार्यकर्ते दुपारी एक वाजता निघणार आहेत. त्यामुळे एक वेगळा उत्साह या निमित्ताने दिसून येणार आहे. या सभेत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, शेकाप नेते जयंत पाटील व अन्य दिग्गज मंडळी मार्गदर्शन करणार आहेत.
Exit mobile version