| रसायनी | वार्ताहर |
खालापूर तालुक्यातील खोपोली, चौक व रसायनी परिसरात अनेक भागात रोजच्या रोज त्याच त्या स्वरुपाच्या तक्रारी आहेत. महावितरणची यंत्रणा योग्य ती दीर्घकालीन उपाययोजना करण्यात कमी पडत असून, याविरोधात नागरिक जनआंदोलन करतील, असा इशारा दिनकर भुजबळ यांनी दिला आहे. बिले वसुली करताना जशी तत्परता व धमक दाखवली जाते, तशी सेवेचा दर्जा समाधानकारक राखण्यासाठी दाखवली जात नाही, याची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दखल घेण्याची गरज आहे, असेही भुजबळ यांनी म्हटले आहे. आमदारांच्या माध्यमातून सर्व क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत एक बैठक आयोजित करुन ग्राहक समस्या निवारण्यासाठी कृती आराखडा तयार करण्याबाबत विचार विनिमय करणे गरजेचे आहे, अशी समस्याग्रस्तांची तीव्र भावना आहे.







