नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; पर्यायी जागेवर हलविण्याची माणी
| कर्जत | प्रतिनिधी |
गुंडगे, भिसेगाव, नांगुर्ले गाव तसेच घनकचरा प्रकल्पालगत असणार्या वसाहतीतील नागरिकांच्या आरोग्याला कर्जत नगरपरिषदेचा घनकचरा प्रकल्प धोकादायक ठरत आहे. हा धोकादायक प्रकल्प दुसर्या पर्यायी जागेवर हलविण्यात यावा, याकरिता गुरुवारी (दि.11) दुपारी 12 च्या दरम्यान कर्जत नगरपरिषदेच्या कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन घनकचरा प्रकल्प हटाव संघर्ष समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
कर्जत नगरपरिषदेवा हा घन कचरा प्रकल्प गुंडगे, भिसेगाव, नांगुर्ले गाव तसेच प्रकल्पालगत असणार्या वसाहती परिसरातील नागरिकांना आजरपणाचे आमंत्रण देणारा आहे. या प्रकल्पातून रोज दुर्गंधी सुटत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अक्षरशः घराची दारे, खिडक्या बंद कराव्या लागत आहे. सुरुवातीला या प्रकल्पात गांडूळ खत प्रकल्प सुरू होता. त्यामुळे फारसा वास येत नव्हता. परंतु, आता या प्रकल्पामध्ये कचर्याचे डोंगर उभे राहिले आहेत. त्याचबरोबर या प्रकल्पात रोज संध्याकाळी खराब झालेली राहिलेली मच्छी टाकली जाते. खांडपे तसेच इतर ग्रामपंचायतीच्या हद्दीतील हॉटेलमधील घाण टाकली जाते. या सर्व प्रकारामुळे या भागातील शुद्ध हवा अशुद्ध झाली आहे. प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. हे प्रदूषण रोखण्यास कर्जत नगरपरिषद अपयशी ठरत आहे.
विकासाला बाधा
या जागेमध्ये येथील नागरिकांसाठी रुग्णालय, क्रीडांगण, उद्यान बांधण्यासाठी त्याचा वापर होणे गरजेचे होते. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकर्यांच्या शेतजमीन नापिक झाल्यामुळे त्यांनी शेती करणे बंद केल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. परिसरातील गुड शेफर्ड शाळेच्या विद्यार्थ्यांनादेखील त्रास सहन करावा लागत आहे.
नागरिकांच्या मागण्या
सदरचा प्रकल्प नसून तो गांडूळ खत प्रकल्प आहे असे सांगण्यात आले होते. तसेच या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनाच्या गुरचरण जागेचा वापरात करण्यात आला आहे. या प्रकल्पात इतर ग्रामपंचायतींच्या हॉटेलची घाण कचरा येत आहे. तो बंद करावा. भिसेगाव रेल्वे भुयारी मार्ग होणार होता तो का थांबवण्यात आला? आदी प्रश्नांविषयी कर्जत नगर परिषदेला जनआक्रोश मोर्चातून जाब विचारण्यात येणार आहे. त्यासाठी गुंडगे, भिसेगांव, नागुर्ले गाव तसेच घनकचरा प्रकल्पालगत असणार्या वसाहतीतील सर्व सामजिक मंडळांनी पुढाकार घेतला आहे.