अंडरपास रोडसाठी जनआक्रोश

आंबेवाडी वरसगांव येथील नागरिक आक्रमक; मंत्री भरत गोगावलेंची यशस्वी मध्यस्थी

| कोलाड | प्रतिनिधी |

मुंबई-गोवा महामार्गांवरील आंबेवाडी वरसगांव बाजारपेठेत उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. या बाजारपेठेत ये-जा करण्यासाठी कोणताही मार्ग ठेवला नाही. यामुळे बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी शुक्रवार, दि.5 डिसेंबर रोजी दोन अंडरपास रोड बनविण्यात यावा यासाठी दोन तास बाजारपेठेत बंद करून जनआक्रोश आंदोलन करण्यात आला. मंत्री भरत गोगावले यांच्या मध्यस्थीने आंदोलन थांबाविण्यात आले.

यावेळी पर्यायी मार्ग काढण्यासाठी मंत्री भरत गोगावले हे उपस्थित होते. यावेळी एन.एच. आयचा अधिकारी निखिल कुमार यांच्याशी चर्चा करून सांगितले की, आम्ही तुमचे काम थांबावत नाही. परंतु तुम्ही आंबेवाडी बाजारपेठेतील व्यापाऱ्यांची समस्या जाणून घ्या, त्यासाठी त्यांना दोन अंडरपास रस्ते गरजेचे आहेत. यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी अंडरपास रस्ता पाहिजे ती जागा शिल्लक ठेवून पुढील काम सुरु ठेवा.

यावेळी संजय कुर्ले, गणेश शिंदे, महेंद्र वाचकवडे, चंद्रकांत लोखंडे, चंद्रकांत जाधव, उदय खामकर, प्रमोद लोखंडे, कुमार लोखंडे, भरत सातांबेकर, जगदीश प्रभू, श्रीकांत चव्हाण, मनोज जवके, जापारा राठोड, मयूर जैन, भावेश जैन, असंख्य व्यापारी, रहिवासी नागरिक, रिक्षा, अपेरिक्षा, मिनिडोअर, टेम्पो, संघटनेचे असंख्य पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

आंबेवाडी वरसगांव बाजारपेठेत उड्डाणपुलाचे काम सुरु असून, या बाजारपेठेत प्राथमिक आरोग्य केंद्र, आंबेवाडी ग्रामपंचायत कार्यलय, ज्येष्ठ नागरिक सभागृह, अंबरसावंत मंदिर, अंगणवाडी असल्यामुळे या मार्गाकडे जाण्यासाठी अंडरपास रस्ता नसल्यामुळे या नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार आहे. तसेच पलीकडे स्मशानभूमी, व्यावसायिकांच्या दुकानात तसेच इतर ठिकाणी जाण्यासाठी अंडरपास रस्ता पाहिजे होता. यासाठी संबंधित हायवेच्या अधिकारी यांनी येथील नागरिकांना विश्वासात घेऊन जनसुनावणी घ्यायला पाहिजे होती. यासाठी येथील नागरिकांनी निवेदन दिले. परंतु, यासाठी कोणीच उपस्थित राहिले नाहीत.

यासंदर्भात मुंबई-गोवा महामार्गाचे काम एप्रिल 2026 पर्यंत पूर्ण होईल अशी नवीन डेडलाईन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. तरी तूर्तास जनआंदोलन थांबविले असले तरी आंबेवाडी बाजारपेठेतील दोन अंडरपास रस्त्याच्या कामाची समस्या येत्या पंधरा दिवसांत पूर्ण झाली नाही, तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा आंबेवाडी बाजारपेठेतील नागरिकांकडून देण्यात आला आहे.

Exit mobile version