महामार्गावरील ‘जनआक्रोश’ स्थगित

| माणगाव । प्रतिनिधी ।

मुंबई – गोवा महामार्गाच्या 17 वर्ष रखडलेल्या कामाच्या निषेधार्थ जनआक्रोश समितीने 15 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. समितीने हाती घेतलेल्या या प्रश्‍नाबाबत त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध संस्था-संघटना यांनी जाहीर पाठिंबा दिला होता. कोकणवासीयांच्या हा एकजुटतेचा विजय विचारात घेऊन जनतेच्या विनंतीला मान देत सलग सहा दिवस उपोषणाला बसलेले सुरेंद्र पवार, रुपेश दर्गे, संजय जंगम यांनी मंगळवारी उपोषण स्थगित केले. यावेळी आंदोलकांकडून माणगावजवळील गारळ गावच्या हद्दीत मुंबई -गोवा महामार्गावर नुकत्याच झालेल्या दुचाकी अपघातात बळी गेलेल्या सोनाली भिसे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कोकणवासीयांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्‍नासाठी उपोषणाच्या पाचव्या दिवशी माणगाव व्यापारी असोसिएशनने उपोषणकर्त्यांना पाठिंबा म्हणून मंगळवारी (दि.20) माणगाव बंदची हाक देऊन या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार माणगावात व्यापार्‍यांनी बंद पाळून ते सर्व उपोषणकर्त्याच्या आंदोलनात सहभागी झाले. जनआक्रोश समितीने रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाला गती मिळावी या प्रश्‍नासाठी या समितीला स्वराज्यभूमी आंदोलन व समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव, समितीला कुणबी समाज समन्वय समिती रायगड जिल्हा, माणगाव व्यापारी असोसिएशन, रिक्षा संघटना माणगाव, रामनवमी उत्सव समिती, मावळा प्रतिष्ठान, बजरंग दल, कुणबी सेवा चॅरिटेबल ट्रस्ट लोणेरे-गोरेगाव-माणगाव-मुंबई यांच्यासह विविध संघटना, लोकप्रतिनिधींनी जाहीर पाठिंबा दिला होता. गेली सहा दिवस जनआक्रोश समितीतर्फे हे आमरण उपोषण सुरु होते. दरम्यानच्या काळात आ. भरत गोगावले यांनी मध्यस्थी करून उपोषणकर्त्यांची दोनदा भेट घेऊन या प्रश्‍नाबाबत मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवरून संवाद साधून आपला हा महामार्गाचा प्रश्‍न लवकरच निकाली काढला जाईल असे सांगून शिष्ट मंडळाची मुंबई येथे बैठक घेऊ असे सांगितले. परंतु हि बैठक झाली नाही. त्यामुळे आंदोलनकर्ते अधिकच निराश होऊन सर्वानी माणगावात मंगळवारी रास्ता रोको आंदोलन करीत कोकणातून निवडून गेलेल्या सर्व लोकप्रतिनिधींचा तसेच सरकारचा विविध घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

या आंदोलनात जनआक्रोश समितीचे अध्यक्ष अजय जाधव, स्वराज्यभूमी आंदोलन व समृद्ध कोकण संघटना अध्यक्ष संजय यादवराव, उपोषणकर्ते सुरेंद्र पवार, रुपेश दर्गे, संजय जंगम, संजय साबळे यांच्यासह अनेकांनी तीव्र भावना व्यक्त करीत महामार्गाचे हे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा दिला. या आंदोलनात माणगाव व्यापारी असोसिएशन अध्यक्ष लक्ष्मण दळवी, माजी नगराध्यक्ष आनंद यादव, उपनगराध्यक्ष राजेश मेहता, सामाजिक कार्यकर्त्या शर्मिला सत्वे, नगरसेवक, विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्ते, विविध संस्था- संघटनांचे कार्यकर्ते,रिक्षा संघटनेचे कार्यकर्ते यांच्यासह माणगाव तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थ व कोकणवासीय हजारोंच्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात ‘यह तो सिर्फ झाँकी है, अभी आगे बहुत कुछ बाकी है।’ असा इशारा आंदोलकांबरोबरच सबंध कोकण वासियांकडून देण्यात आला.

Exit mobile version