| तळा | प्रतिनिधी |
तळा शहरात शिवसेना (उद्धव ठाकरे) जनसंपर्क कार्यालयाचा लोकार्पण सोहळा दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. या कार्यालयामुळे तळा तालुक्यात शिवसेना ठाकरे गट वाढण्यासाठी मदत होणार आहे. तळा तालुक्यात शिवसेना शिंदेगट, भाजप व राष्ट्रवादी अजित पवार गट हे तिन्ही पक्ष महायुती म्हणून एकत्र असून तालुक्यातील विविध मूलभूत समस्या, नागरिकांच्या अडचणी याकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यातील विविध समस्यांबाबत आवाज उठवण्याचे काम शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्ष नेहमीच करणार असून तालुक्यातील सर्वसामान्य जनतेला आपले प्रश्न मांडण्यासाठी हक्काची जागा म्हणून हा जनसंपर्क कार्यालय कायम कार्यरत राहणार आहे. तसेच, जनसामान्यांचे प्रश्न या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी कटिबद्ध राहणार असल्याचे प्रतिपादन शिवसेना (उद्धव ठाकरे) तालुका प्रमुख विलास ठसाळ यांनी केले. यावेळी दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख नंदू शिर्के, युवासेना जिल्हाप्रमुख चेतन पोटफोडे, अल्पसंख्याक जिल्हा प्रमुख अरीफ मनेर, उपतालुका प्रमुख भगवान शिंदे, शहर प्रमुख नजीर पठाण, हरिश्चंद्र म्हातले, गणेश निवाते, सुनिल जाईलकर यांसह शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.







