संजय भोईर यांचा जनआंदोलनाचा इशारा
| पाली/बेणसे | प्रतिनिधी |
रायगडच्या कुहिरे गावात रिलायन्स कंपनीच्या बायोगॅस प्रकल्पामुळे सतत तीव्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे येथील जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. या होणाऱ्या तीव्र दुर्गंधीबाबत तात्काळ चौकशी व कठोर कारवाई करण्याबाबत माजी सभापती तथा विद्यमान पेण पंचायत समिती सदस्य संजय भोईर यांनी थेट प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ रायगड विभाग यांच्याकडे तक्रारी अर्ज देऊन तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
या अर्जातून संजय भोईर यांनी, येथील प्रदूषण व दुर्गंधीची अत्यंत गंभीर बाब महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांच्या स्पष्टपणे निदर्शनास आणून दिली आहे. जनहितासाठी भोईर यांनी या विषयात विशेष पुढाकार घेऊन आक्रमक पावित्रा घेत जन आंदोलनाचादेखील इशारा दिला आहे. या तक्रारी निवेदनात म्हटले आहे की, शिहू नागोठणे परिसरातील कुहिरे गावातील अनेक नागरिकांकडून माझ्याकडे येथील दुर्गंधी बाबत तोंडी तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. रिलायंस बायोगॅस कंपनी यांच्या या प्रकल्पाचे काम सुरू झाल्यापासून कुहिरे गाव व आजूबाजूच्या परिसरात सातत्याने तीव्र व असह्य दुर्गंधी पसरत आहे. ही दुर्गंधी विशेषतः सकाळी व रात्रीच्या वेळी अधिक प्रमाणात जाणवत असून ग्रामस्थांना दैनंदिन जीवन जगणे कठीण झाले आहे. या दुर्गंधीमुळे अनेक नागरिकांना घराचे दरवाजे व खिडक्या दिवसभर बंद ठेवावे लागत आहेत. लहान मुले, जेष्ठ नागरिक व महिलांना डोकेदुखी, मळमळ, उलट्या होण्याची भावना, घशात खवखव व श्वसनास त्रास अशा आरोग्यास घातक तक्रारी जाणवत आहेत. काही नागरिकांनी डोळ्यांची जळजळ व अस्वस्थता याबाबतही तक्रारी केल्या आहेत. तसेच, शिहू-नागोठणे मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना देखील या दुर्गंधीचा तीव्र त्रास सहन करावा लागत असून सार्वजनिक रस्त्यावर अशा प्रकारचा वास येणे ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. भविष्यात यामुळे सार्वजनिक आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची दाट शक्यता वर्तविली आहे.







