सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इमारती आल्या डबघाईला

। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमध्ये विविध खात्यांचे बंगले, वास्तू अनेक वर्षांपासून येणार्‍या अधिकारी वर्गासाठी उपलब्ध आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे तीन जागी बंगले आहेत.निसर्गाच्या सान्निध्यात गर्द वनराईत इंस्पेक्षण बंगला, माऊंट बंगला आणि एक हॉटेल बाईकसमोर बंगला आहे. जुन्या काळातील बांधकाम केलेल्या या हेरिटेज वास्तू खूपच आकर्षक होत्या; परंतु त्याकडे या खात्याचे दुर्लक्ष होत असल्याने त्या डबघाईला आलेल्या असून, काही वर्षांतच त्या इतिहासजमा होतील, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
मागील काही वर्षांपूर्वी यातील काही बंगल्यांची डागडुजी करण्यात आली होती. त्यानंतर इकडे कुणीही लक्ष केंद्रित केले नाही. केवळ ठेकेदारांना काम देण्यासाठीच की काय किरकोळ मलमपट्टी करण्यात आली होती. या वास्तू सुरू केल्यास संबंधित अधिकारी वर्गाला तसेच त्या खात्यातील कर्मचारी यांना काही दिवस मुक्कामी राहता येऊ शकते. परंतु, या खात्याची याबाबतीत काहीएक मानसिकता दिसत नसल्याने या सर्व वास्तू लवकरच डबघाईला येऊन निश्‍चितपणे इतिहासजमा होण्याच्या मार्गावर आहेत.

Exit mobile version