पेंढ्याच्या छपरातून काव्यसंग्रहाचे प्रकाशन

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कवी राजाराम भगत यांच्या पेंढ्याच्या छपरातून या काव्यसंग्रहातील कवितांना मातीचा गंध जाणवतो, हा गंध रसिकांना मंत्रमुग्ध करणारा आहे, असे प्रतिपादन आगरी सामाजिक संस्था, अलिबागचे अध्यक्ष, कादंबरीकार कैलास पिंगळे यांनी केले. रविवारी (दि. 24) रविराजनगर (विद्यानगर) येथील रानवारा भवनात साहित्यिक उमाजी केळुसकर यांच्या हस्ते कवी राजाराम भगत यांच्या मपेंढ्याच्या छपरातूनफ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले. तसेच रिलायन्स इंडस्ट्रिज, नागोठणेच्या जनरल मॅनेजरपदी बढती मिळाल्याबद्दल साहित्यिक रमेश धनावडे यांचा कवी राजाराम भगत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम आगरी सामाजिक संस्थेने आयोजित केला होता.

याप्रसंगी कार्यक्रम प्रमुख कवी डॉ. जगदीश थळे, बाबुलाल पाखरे, काशिनाथ मोकल, विजया राजाराम भगत, ज्योती पाटील, स्वाती पाटील, जगदीश भगत, सतीश भगत, विजया सतीश भगत, श्रीरंग घरत, रेखा मोकल, नाट्यअभिनेते प्रकाश पाटील, जीविता पाटील, वैशाली पाटील, सुभाष मोकल, रमेश थळे, संदीप भोईर, ज्ञानेश्‍वर पाटील, विक्रांत भगत, अनिल नाईक, सीताराम सूर्यवंशी, मनीष भायदे, दिनेश पाटील, शोभा भगत, प्रियांका भगत, सोनल पाटील आदी उपस्थित होते. याप्रसंगी कादंबरीकार कैलास पिंगळे अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. त्यांनी काव्यसंग्रहाचा रसास्वाद करुन कवी राजाराम भगत यांच्या काव्य प्रवासाला शुभेच्छा दिल्या.

साहित्यिक उमाजी केळुसकर यांनी कवी राजाराम भगत यांची कविता जगण्याचे भान राखणारी आहे, तसेच पेंढ्याच्या छपरातून हे शीर्षक काव्यसंग्रहाला देऊन जुन्या जाणिवांचा जागर केला असल्याचे कौतुगोद्गार काढले. बाबुलाल पाखरे, ज्योती पाटील यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. प्रारंभी कवी. डॉ. जगदीश थळे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन जीविता पाटील यांनी केले. याप्रसंगी काशिनाथ मोकल यांनी नटसम्राट नाटकातील एक स्वगत सादर केले, तसेच रमेश धनावडे यांनी व वैशाली पाटील यांनी आपल्या कवितांनी या कार्यक्रमाला बहार आणली. नाट्यअभिनेते प्रकाश पाटील यांच्या आभाराने कार्यक्रमाचा समारोप झाला.

Exit mobile version