आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी दिले आशीर्वाद
| चौल | प्रतिनिधी |
ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते कृषीवलच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन मंगळवारी (दि. 5) रेवदंडा येथील निवासस्थानी झाले. कृषीवल दिवाळी अंकाचे आप्पासाहेबांनी तोंडभरुन कौतुक करुन संपूर्ण कृषीवल परिवाराला आशीर्वाद देत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. कृषीवल दिवाळी अंक दरवर्षी मी आवर्जून वाचतो, असेही यावेळी त्यांनी सांगितले. दरम्यान, अलिबागची कोळीणबाय अर्थातच आपल्या खाद्यपदार्थांची चव जगभरातील खवय्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून चाखायला जावणार्या नलिनीकाकू यांच्या हस्तेही त्यांच्या थेरोंडा-आगल्याची वाडी येथील निवासस्थानी प्रकाशन झाले.
दिवाळी म्हटली की लाडू, करंजीचा फराळ येतोच. पण, दिवाळी अंकाच्या रुपाने साहित्यिक फराळही घरोघरी फस्त केला जातो. दिवाळी अंकांच्या भाऊगर्दीत दैनिक कृषीवलचा अंक वेगळेपण जपणारा असतो. कला, संस्कृती आणि वैचारिक साहित्याने परिपूर्ण ठरलेल्या या दिवाळी अंकाने वाचकांच्या हृदयात स्थान मिळवलेले आहे. याच परंपरेतून यंदाचा दिवाळी अंक मनोरंजनासह भरपूर वैचारिक खाद्य देणारा, वाचकांची अभिरुची समृद्ध करणारा असा आहे. कृषीवल दिवाळी अंकाचे शानदार प्रकाशन मंगळवारी आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या हस्ते पार पडले.
दिवाळी अंकाच्या प्रकाशानावेळी कृषीवलच्या कार्यकारी संपादक माधवी सावंत, व्यवस्थापक रुपेश पाटील, अकॉउंटन्ट दर्शना पाटील, जाहिरात व्यवस्थापिका हर्षा नाईक-पाटील, वरिष्ठ उपसंपादक राकेश लोहार, छायाचित्रकार सुरेश खडपे उपस्थित होते. यावर्षीच्या कृषीवलच्या दिवाळी अंकात अनेक मान्यवरांचे लेख आहेत. सल्लागार संपादक प्रसाद केरकर यांनी आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असणार्या धारावी झोपडपट्टी अदानीच्या घशात घालण्याचा डाव सत्ताधारी सरकारचा असल्याबाबत सरकारच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारा लेख लिहिला आहे. रायगडची रणरागिणी मीनाक्षीताई पाटील यांच्या विधिमंडळातील कार्यावर प्रा. महेश बिर्हाडे यांचा अभ्यासपूर्ण लेख आहे. तर, राजकारण समाजकारण, मनोरंजन, क्रीडा आदी सर्वच क्षेत्रात वावर असणारं रायगडातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व अर्थात चित्रलेखा पाटील यांच्या अफाट कार्याचा धांडोळा कार्यकारी संपादक माधवी सावंत यांनी घेतला आहे.
ऑलिम्पिकमध्ये तमाम भारतीय महिलांचे प्रतिनिधीत्व करताना उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर दोन पदके पटकाविणारी मनू भाकरच्या जीवनप्रवासाबाबत विनायक दळवींनी प्रकाशझोत टाकला आहे. सध्याचा काळ निवडणुकांचा असल्याने राजकारणाविषयी विशेष परिसंवादात लेखकांनी आपले परखड मत व्यक्त केले आहे. जुन्या जमान्यापासून ते आतापर्यंतचे मराठी चित्रपटसृष्टीतील खलनायकांचे विलास फडके यांच्या लेखणीतून उतरलेले धम्माल किस्से आहेतच. रायगड जिल्ह्याच्या विकासावर लिहिताना राजकारण्यांनी आपला सात पिढ्यांचा विकास कसा केला? तसेच खरंच रायगडचा विकास झालाय का? याबाबत सहाय्यक संपादक आविष्कार देसाईंनी वाचनीय लेख लिहिला आहे. आजच्या ऑनलाइनच्या जमान्यात आठवडी बाजार ते ऑनलाइन शॉपिंग यावर सहाय्यक संपादक सुयोग आंग्रेनी अभ्यासपूर्ण मांडणी लेखाच्या माध्यमातून केली आहे.
विशेष आकर्षण
अलिबागची कोळीणबाय नलिनीकाकू यांच्या रेसिपीज् खास वाचकांसाठी दिल्या असून, हेच दिवाळी अंकाचे विशेष आकर्षण आहे. नलिनीकाकू यांचे सोशल मीडियावर लाखोंच्या संख्येत चाहते आहेत. त्यांचे घरगुती मसाले आणि विविध प्रकारच्या आगरी-कोळी पद्धतीच्या खाद्यपदार्थांनी जगभरातील खवय्यांना भुरळ घातली आहे.
मनोरंजनासह भरपूर वैचारिक खाद्य..
गुरु-शिष्यांवर भाष्य करणारे ज्येष्ठ अभिनेत्री वंदना गुप्ते, नृत्यांगणा शर्वरी जमेनिस, कवी अरुण म्हात्रे यांनी आपले विचार मनमोकळेपणाने मांडले असून, त्यांचे लेख वाचनीय झाले आहेत. विविध कथांमुळे अंकाला भारदस्तपणा आला आहे. दिगज्जांच्या कविता आहेत. विविध विषयांनी नटलेला दैनिक कृषीवलचा दिवाळील अंक वाचकांसाठी अतिशय वाचनीय असाच आहे.